महाराष्ट्र जिंकण्यासाठी एकजुटीने काम करा : रवींद्र चव्हाण

Edited by: विनायक गांवस
Published on: August 03, 2024 14:15 PM
views 164  views

सावंतवाडी : केंद्राच्या व राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याच काम करताना जाती, पातीचा विचार कधीही केला नाही. येत्या साडेतीन महिन्यांत पेटुन उठून काम करायला हवं. निवडणूकांना कसं सामोर जाणार याचा विचार करायला हवा. लोकसभा निवडणुकीत ज्या बुथला मागे राहिलो तिथल्या मतदारांपर्यंत पोहचा. मतपरिवर्तन करण्याची ताकद आपल्यात आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्र जिंकण आवश्यक असून त्यासाठी एकजुटीने काम करा व आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी कामाला लागा असं आवाहन रविंद्र चव्हाण यांनी केल. सावंतवाडीतील भाजपच्या विस्तारीत जिल्हा कार्यकारिणी बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 

ते म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अधिवेशन होत आहे. या माध्यमातून भाजपच्या कार्यकर्त्यांला पुण्यातील अधिवेशनात सुचित केलेल्या गोष्टी पोहचवल्या जाणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुका भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली व महायुतीतून होणार असल्याचे अमित शहांनी सांगितले आहे. त्यांनी केलेल्या सुचनांच अनुकरण आपल्याला करायचं आहे, असे त्यांनी सांगितले.

 मागील निवडणूकीत म्हणजेच २०१९ ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी प्रत्येक कार्यकर्ता झटला. १४५ मॅजिक फिगर गाठता न आल्यानं जे झालं ते सर्वश्रुत आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी गाफिल न रहाता आगामी साडेतीन महिन्यांत दिवसरात्र कार्यरत रहावं, असं आवाहन त्यांनी केलं. लोकसभा निवडणुकीत भाजपचा खासदार निवडून आणण्याचं सिंधुदुर्गनं ठरवलं. त्याप्रमाणे एक लाखांचं मताधिक्य घेत खासदार नारायण राणे यांचा विजय संपादन केला. रत्नागिरीतही आमच्या कार्यकर्त्यांनी विरोधकांना रोखून धरलं. गावागावातील कार्यकर्त्यांनी लढा दिला नसता तर हा दिवस दिसला नसता. या विजयाचा खरा शिलेदार कोण असेल तर तो कार्यकर्ता आहे,असही ते म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्राच्या माध्यमातून फार मोठं काम केलं आहे. अनेक लोकोपयोगी योजना त्यांनी राबविल्या आहेत. राज्यातही महायुतीचं सरकार म्हणून आम्ही अनेक योजना आणल्या आहेत. तळागाळातील लोकांच्या उत्कर्षासाठी काम करीत आहोत. 

मात्र, एवढं काम केलेलं असताना महायुतीला मतदान का केलं नाही, याबद्दल विचारायला हवं. आमच्या सरकारची काय चूक झाली हे विचारायला हवं. त्यांची दिशाभूल होत असेल तर ते रोखले पाहिजे व भाजपला मतदान करण्यासाठी व सत्ता स्थापन करण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 कोकणातील मतदार महायुती सोबत राहील हा विश्वास आहे. २०१४ पासून आजपर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं काम किती उजव होत ते सिद्ध होत आहे. सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्गात भाजपचा नगराध्यक्ष असल्यानं तिथलं चित्र बदललं. त्याच प्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीत काम करायला हवं. केंद्र व राज्य सरकारच्या योजना लोकांना समजावून सांगितल्या पाहिजेत. लोकालोकांमध्ये विष पेरणाऱ्यांना त्यांचे मनसुबे साध्य करायला देऊ नयेत, यासाठी कामाला लागा अशा सूचना रविंद्र चव्हाण यांनी केल्या.