
कणकवली : कणकवली येथे पोलीस ठाण्याच्या बाहेर पोलीस कल्याण निधीसाठी हिंदुस्तान पेट्रोलियमचा पेट्रोल डिझेल पंप गेल्या ४ वर्षापासून चालू करण्यात आला आहे. या पेट्रोल पंपावर खाजगी कंत्राटी कामगार १२ जण कार्यरत आहेत. अचानक खासगी कंत्राटदराने या कर्मचाऱ्यांचं वेतन १ हजार रुपयांनी कमी केल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी रविवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून काम बंद आंदोलन छेडले आहे. त्यामुळे कणकवली शहरातील व बाहेरून आलेल्या वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली आहे.
कणकवली पोलीस ठाण्याच्या बाहेर पोलीस कल्याण निधी अंतर्गत मानव संसाधन विभागामार्फत हिंदुस्तान पेट्रोलियमचा पंप पेट्रोल व डिझेल पंप चालवण्यात येत आहे .या पंपावर खाजगी लेबर ठेकेदाराकडून गेल्या चार वर्षापासून रोखपाल, हिशोबनीस व पेट्रोल,डिझेल सोडणारे कर्मचारी असे दहा ते बारा कर्मचारी कार्यरत आहेत. त्या ठिकाणी एका नव्याने एका संस्थेला ३० तारीखपासून ठेका देण्यात आला आहे. त्याने अचानक वेतन कमी केल्यामुळे गेल्या चार वर्षापासून कार्यरत असलेले कर्मचारी संतप्त झाले आहेत.किमान वेतन प्रमाणे मानधन, भविष्य निर्वाह निधी व अन्य मागण्यासाठी काम बंद आंदोलन छेडले आहे.
संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रशांत घाडीगावकर,अमोल नाईक, भिकाजी कदम, महेश कदम, किशोर गुरव, ओंकार चव्हाण, निलेश राणे, दीपक मडवळ, मंगेश सावंत, राजेश परब,शिवराम दळवी, प्रसाद घाडी आदी कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत .