‘चिपळूण होम मिनिस्टर २०२५’ स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शंभरहून अधिक महिलांचा सहभाग, अजूनही सहभागी होण्याचे आवाहन
Edited by:
Published on: July 16, 2025 19:10 PM
views 81  views

चिपळूण : चिपळूण नगर परिषद, सह्याद्री निसर्ग मित्र व नाटक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘चिपळूण होम मिनिस्टर २०२५’ या विशेष स्पर्धेला शहरातील महिलांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. १५ जुलैपासून सुरू झालेल्या या उपक्रमात शंभरहून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला असून, अजूनही महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ही स्पर्धा १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत चालणार असून, चिपळूण शहरातील सर्व महिलांना सहभागाची संधी खुली आहे. प्लास्टिकमुक्त चिपळूण घडवण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामध्ये सहभागी महिलांनी आपल्या घरातून प्लास्टिक संकलन करायचे आहे. नगर परिषदेकडून घरपोच गाडी पाठवण्यात येणार असून संकलित प्लास्टिकच्या बदल्यात महिलांना कुपन दिले जाणार आहेत. सर्वाधिक कुपन मिळवणाऱ्या महिलेला लकी ड्रॉमधून ‘चिपळूण होम मिनिस्टर’ हा मानाचा किताब बहाल करण्यात येईल.

या उपक्रमात सहभागी प्रत्येक महिलेला गौरवचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार असून लवकरच अंतिम फेरी होणार आहे. यावेळी विजेत्या महिलेला सोन्याची नथ व पैठणीसह विशेष सन्मान देण्यात येणार आहे. महिलांनी केवळ पर्यावरणपूरक कृतीत सहभाग न घेता, सामाजिक नेतृत्वात पुढाकार घ्यावा, हा या उपक्रमामागचा व्यापक उद्देश आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक महिलांनी ७२७६०४७१०७ या क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅपवर आपले नाव व पत्ता पाठवून नोंदणी करावी.

या उपक्रमाचे संयोजन प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले, सह्याद्री निसर्ग मित्रचे भाऊ काटदरे आणि नाटक कंपनीचे मानस संसारे यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे. मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी चिपळूण शहराच्या स्वच्छता आणि सामाजिक सहभागाच्या दृष्टिकोनातून या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५’ च्या पार्श्वभूमीवर चिपळूण शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या दिशेने महिलांचा हा सहभाग म्हणजे सामाजिक जाणीव आणि पर्यावरण सजगतेचे मूर्त रूप आहे. महिलांनी या संधीचा लाभ घेऊन पुढे यावे आणि ‘होम मिनिस्टर’ बनण्याची संधी साधावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.