एसएसपीएम मेडिकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये महिला दिन साजरा

माहितीपूर्ण व्याख्याने आणि प्रात्यक्षिके सादर
Edited by: भरत केसरकर
Published on: March 08, 2023 18:35 PM
views 170  views

सावंतवाडी : एसएसपीएम मेडिकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये सर्व महिलांच्या सन्मानार्थ महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास डॉ. मृदुला महाबळ, डॉ. नवरे, डॉ. शिल्पा झांट्ये या प्रमुख पाहुण्या निमंत्रित करण्यात आल्या होत्या. तसेच डॉ. स्निता सिनीकुमार यांनी कँसर संदर्भात व्हर्चुअल लेक्चर दिले. यामध्ये महिलांना जाणवणारे सर्वसाधारण कर्करोगाची लक्षणे, वेळीच निदान आणि उपचाराचे फायदे यावर महत्वपूर्ण माहिती दिली.

या पुढील टप्यात स्वप्नील वेंगुर्लेकर यांनी समाजात वावरताना महिलांना संरक्षणात्मक कोणत्या परिस्थितींना सामोरे जावे लागते आणि त्यापासून महिलांनी कशाप्रकारे आपले स्वसंरक्षण करावे, याच्या माहिती सादर केली. चैत्राली राजपूत (महाराष्ट्र पोलीस) आणि अप्सना मलिक (महाराष्ट्र पोलीस) यांनी महिला स्वसंरक्षणाचे काही प्रात्यक्षिक सादर केले. तसेच शीतल नांदोस्कर (महाराष्ट्र पोलीस) यांनी सायबर क्राईम यावर माहितीपूर्ण लेक्चर दिले.

सर्वात शेवटी एस एस पी एम मेडिकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटल येथील कर्मचाऱ्यांनी महिलादिन विशेष असे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. ८ मार्च २०२३ रोजी पार पडलेला हा महिलादिन विशेष कार्यक्रम अगदी रम्य वातावरणात पार पडला.