'धाकड है'...महिला बाईक रॅलीचा समारोप

महिला सक्षमीकरणास प्राधान्य : जिल्हाधिकारी अनिल पाटील
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: February 04, 2025 17:42 PM
views 114  views

सिंधुदुर्गनगरी :  जिल्हा पोलिस प्रशानामार्फत राबविल्या जात असलेल्या 'ग्रामसंवाद' ह्या  अभिनव उपक्रमाला नागरिकांचा आणि विशेषत: महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपल्या जिल्ह्यात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक असल्याने महिलांच्या समस्या सोडविण्यासह त्यांच्या सक्षमीकरणास प्रथम प्राधान्य असल्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील म्हणाले.

महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस प्रशासन आणि महिला व बालविकास विभागाच्यावतीने   महिला पोलिस अधिकारी आणि अंमलदार यांच्या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीच्या समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा पोसिल अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधिक्षक कृषिकेश रावले, श्री काटकर उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील विशेष कामगिरी केलेल्या महिला व मुलींचे सत्कार देखील करण्यात आले.

जिल्हाधिकारी म्हणाले, आज या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या महिलांची संख्या खूप जास्त होती. महिला सक्षमीकरणाचे विविध कार्यक्रम गांव पातळीवरही होणे आवश्यक आहे जेणेकरुन महिलांचा सहभाग वाढेल आणि प्रशासन करत असलेले काम त्यांच्यापर्यंत पोहचेल असेही ते म्हणाले.

पोलिस अधिक्षक श्री अग्रवाल म्हणाले,  सिंधुदुर्ग पोलिस प्रशासनामध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे. 'भरोसा सेल'च्या माध्यमातून अनेक समस्यांचे निराकरण करण्यात येत आहे.  मागील वर्षांत १५८ प्रकरणे सोडविण्यात प्रशासनाला यश आले आहे.  'भरोसा सेल'मुळे अनेक कुटुंब जोडल्या गेले आहेत. तालुका स्तरावरील पोलिस ठाण्यात  देखील 'महिला कक्ष' कार्यरत असल्याने महिलांना मुख्यालयात येण्याची गरज राहिलेली नाही. डायल 112 हा प्रकल्‍प राबविला जात आहे. 112 या नंबरवर कॉल आल्यानंतर पोलिसांकडून  तत्‍काळ प्रतिसाद दिला जातो. विशेष म्हणजे या क्रमांकावर महिलांचे मदतीसाठी कॉल आल्यावर तात्काळ मदत देण्यात येते आणि संबंधित महिलांना पुन्हा कॉल करुन त्यांची चौकशी देखील केल्या जाते असेही श्री अग्रवाल म्हणाले.

यावेळी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जिल्हा क्रिडा अधिकारी श्रीमती विद्या शिरस (पॉवर लिफ्टिींग) आणि मेघना शिंदे (आट्यापाट्या), गिर्यारोहण या प्रकारात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुख्य वित्त व लेखा अधिकारी श्रीमती राजश्री पाटील, राष्ट्रीय खेळाडू भूमी सावंत (सॉफ्टबॉल), केशर निर्गुण (कॅरम) अक्सा शिरगावकर (धनुर्विद्या),पूर्वा गावडे (जलतरण), तर राज्यस्तरीय खेळाडू म्हणून वनिता निकम (हँडबॉल) यांना गौरविण्यात आले.