
कुडाळ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत कुडाळ तालुक्यातील अणाव गावात रविवारी (दि. ११ जानेवारी) आयोजित करण्यात आलेला ‘सेलिब्रिटी गावभेट’ कार्यक्रम जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेते पृथ्वीक प्रताप आणि अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. यावेळी दोन्ही सेलिब्रिटींचे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सेलिब्रिटी गाव भेटीसाठी शासनाकडून कुडाळ तालुक्यातील अणाव गावाची निवड करण्यात आली आहे. या सेलिब्रिटी भेट कार्यक्रमाचा शुभारंभ रविवारी झाला. यावेळी पारंपरिक वेषभूषा तसेच डोक्यावर भगवे फेटे परिधान करून अणाव ग्रामस्थ यात सहभागी झाले होते. त्यानंतर श्री देव स्वयंभू रामेश्वर मंदिरात श्रींचे दर्शन घेतल्यानंतर मंदीर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर मंदीर जवळ मुख्य कार्यक्रम पार पडला.
यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी मार्गदर्शन करताना, “शासनाच्या प्रत्येक योजनेत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल असून समृद्ध पंचायतराज अभियानातही हा जिल्हा प्रथम क्रमांकावर राहील,” असा ठाम विश्वास व्यक्त केला.
अभिनेते पृथ्वीक प्रताप यांनी अणाव ग्रामपंचायतीने राबवलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करताना महिला बचत गट, पेशंट बँक, ई-ग्रंथालय, डिजिटल उपक्रम ही अणाव गावाची ओळख ठरत असल्याचे सांगून या अभियानात अणाव गाव राज्यात अव्वल ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांनी मालवणी शैलीत संवाद साधत, “कोकणात येऊन नेहमीच आनंद मिळतो. अणाव ग्रामपंचायतीचे काम अत्यंत प्रेरणादायी आहे. या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि गावाचा नावलौकिक अधिक वाढवावा,” अशा शुभेच्छा ग्रामस्थांना दिल्या.
सरपंच लिलाधर अणावकर यांनी ग्रामपंचायतीमार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचा आढावा घेत, “समृद्ध पंचायतराज अभियानामुळे गावाला विकासाचे व्यासपीठ मिळाले असून लोकसहभागातून अणाव गाव प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे,” असे सांगितले. जि.प.च्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, कुडाळ पं.स.चे गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, अणाव सरपंच लिलाधर अणावकर, उपसरपंच आदिती अणावकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रदीप नारकर, निवृत्त गटविकास अधिकारी बाळकृष्ण परब, सामाजिक कार्यकर्ते संदीप परब, तंटामुक्त समिती अध्यक्ष विनायक अणावकर, पोलीस पाटील सुनिल पाटकर, माजी उपसभापती जयभारत पालव, माजी सरपंच नारायण मांजरेकरआदींसह अधिकारी, ग्रा.पं.सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान पेशंट बँकचे लोकार्पण, महिला बचत गटांच्या स्टॉल्सची पाहणी, कापडी पिशव्यांचे अनावरण तसेच ग्रामपंचायतीच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. संजय गोसावी यांनी समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत काढलेली रांगोळी लक्षवेधी ठरली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त गटविकास अधिकारी बाळकृष्ण परब यांनी केले.










