महिलांनी स्वयंसिद्ध होणे गरजेचे : विक्रांत सावंत

सरपंच गुणाजी गावडे - श्री कलेश्वर महिला ग्रामसंघ यांचं आयोजन
Edited by: विनायक गांवस
Published on: March 18, 2026 12:02 PM
views 50  views

सावंतवाडी : आपल्या जीवनात स्त्रीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. घराला घरपण देणारी आई, आजी, बहीण, पत्नी अशा अनेक भूमिका निभावणारी स्त्री ही खऱ्या अर्थाने जगाचा उद्धार करणारी माता आहे. स्त्री शिवाय अवघे विश्व अधुरे आहे. त्यामुळे महिलांचा सन्मान झालाचं पाहिजे. आपल्या छत्रपती शिवरायांनी देखील आपल्याला महिलांचा सन्मान करण्याचा संस्कार दिलाय. आताच्या काळात महिलांनी आत्मनिर्भरतेने स्वतःला कमी न लागता स्वयंसिद्ध होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य विक्रांत सावंत यांनी केले. 


वेत्ये येथे सरपंच गुणाजी गावडे आणि श्री कलेश्वर महिला ग्राम संघ यांच्या वतीने आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, सरपंच गुणाजी गावडे, माजगाव ग्रामपंचायत सदस्य संजय कानसे, ग्राम विकास अधिकारी स्वाती कदम, ग्राम संघाच्या नितेशा नाईक, तसेच ग्रामपंचायत सदस्या तन्वी गावकर, नंदिनी निगुडकर व बीआरपी प्राची राऊळ, बीडीएसपी श्रुती रेडकर यांसह अन्य उपस्थित होते.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर मान्यवरांचे स्वागत ग्राम संघाच्या वतीने संतोषी गावकर, सायली गावकर, प्रांजली तेंडोलकर, नूतन कोकुळकर, याशिका गावडे, अस्मिता गावडे, नितेशा नाईक, जागृती गावकर, विणा मिठबांवकर, पूजा देऊलकर, एकता गावकर यांच्या हस्ते करण्यात आले.

दरम्यान, महिला दिनानिमित्त ग्राम संघाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. यासाठी लोकमान्य मल्टीपर्पजचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी महिला दिनानिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम, फनी गेम्स व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा देखील पार पडला.यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत पुढे म्हणाले, वेत्ये गावाशी माझे भावनिक ऋणानुबंध आहेत. येथील सरपंच गुणाजी गावडे सातत्याने विधायक उपक्रम राबवत असून त्यांच्या या कार्यकर्तृत्वाचा कितीही गौरव केला तरी कमीच आहे. मात्र हे सगळे करत असताना त्यांना येथील महिला भगिनींची उत्तम साथ लाभत असून यापुढेही जे जे सहकार्य लागेल ते नक्कीच आपल्या वतीने करण्यात येणार असल्याचे आश्वासन देखील श्री. सावंत यांनी यावेळी दिले.

पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर म्हणाले की आज महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. माझ्या सुद्धा व्यवसायात माझ्या सौभाग्यवती यांचा मौलिक वाटा आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्त्रीचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असून महिलांच्या उन्नतीसाठी पंचायत समितीच्या माध्यमातून जे जे सहकार्य लागेल ते नक्की करण्यात येणार असल्याचे श्री. गावकर म्हणाले.सरपंच गुणाजी गावडे यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले. श्री. गावडे म्हणाले महिलांची प्रगती ही समाजाच्या प्रगतीला एका अतिउच्च शिखरावर नेणारी असते. एक महिला सुशिक्षित झाली तर अनेकांना दिशा मिळते. त्यामुळे महिलांनी जास्तीत जास्त शिक्षण घ्यावे तसेच छोट्या छोट्या उद्योगातून भरारी घ्यावी. त्यासाठी शासनाच्या स्तरावरून व ग्रामपंचायत स्तरावरून जे जे सहकार्य लागेल ते सर्व सहकार्य नक्की केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.माजगाव ग्रामपंचायत सदस्य संजय कानसे यांनी आपल्या मनोगतातून महिला दिनाच्या आढावा घेतला. यावेळी बीआरपी प्राची राऊळ व ग्राम विकास अधिकारी स्वाती कदम यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. यात ब्राह्मणदेव समुहाच्या सौ. भागीरथी मांजरेकर, सूर्या समुहाच्या सौ. उर्मिला काका सावंत, हिरकणी समुहाच्या सौ. अस्मिता अशोक जाधव, पूर्वी देवी समूहाच्या सौ. शालिनी श्रीधर कोकुळकर यांचा शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. तसेच नवीन गट स्थापन करण्यात आलेल्या मंगलमूर्ती महिला समूह व समृद्ध उत्पादित गट यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. तसेच लोकमान्य मल्टीपर्पजचे स्वराज पाटील व गौरी जुवेकर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितेशा नाईक यांनी केले तर बहारदार सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी केले. शेवटी अस्मिता गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

यावेळी महिलांसाठी फनी गेम्स घेण्यात आले. यात प्रा. रुपेश पाटील यांनी अत्यंत नावीन्यपूर्ण पद्धतीने व मनोरंजक खेळ यांच्या माध्यमातून महिलांचे प्रबोधन केले. तसेच ज्ञानानात्मक माहितीद्वारे नारीशक्तीचा जागरही केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरपंच गुणाजी गावडे आणि श्री कलेश्वर महिला ग्राम संघ यांच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.