
वैभववाडी : कोकीसरे येथील माधवराव पवार विद्यालयानजीक झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या बेर्ले येथील ममता महेंद्र राऊत (वय ४९) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोल्हापूर येथे उपचार सुरू असताना शनिवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.हा अपघात शुक्रवारी (ता.२२) सायंकाळी घडला होता. ममता राऊत या पती महेंद्र राऊत यांच्यासमवेत दुचाकीवरून अरूळे येथून खांबलवाडी मार्गे वैभववाडी रेल्वे स्थानकाकडे जात होत्या. दरम्यान, कोकीसरे येथील माधवराव पवार विद्यालयाजवळील गतीरोधकावर दुचाकी चालकाने अचानक ब्रेक लावल्याने मागे बसलेल्या ममता राऊत या रस्त्यावर कोसळल्या.
या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना तात्काळ वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना कणकवली येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना तातडीने कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान शनिवारी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे अरुळे व बेर्ले गावात हळहळ व्यक्त होत आहे










