
कणकवली : विदयार्थ्यांचा सर्वांगिण विकास करणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट असते. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ग्रामिण भागातील शाळांकडे आवश्यक सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत, म्हणूनच ग्रामिण - भागातील शाळांतील विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी, त्यांच्या उपजत गुणांना वाव देण्यासाठी विविध सोयी सुविधा देऊन शालेय वातावरण सुदृढ बनविण्यासाठी जिल्ह्यातील भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर विशेष प्रयत्नशिल असतात. त्यांच्या पुढाकाराने विविध सेवाभावी संस्था आणि व्यक्तींकडून उपलब्ध झालेल्या निधीतून जिल्ह्यातील अनेक शाळांचे परिसर आनंददायी बनले आहेत.
पोईप सर्कल एज्युकेशन सोसायटी या संस्थेमार्फत सौ. इं. द. वर्दम हायस्कूल व कला व वाणिज्य (संयुक्त) कनिष्ट महाविद्यालय चालविले जाते. संस्थेच्या या शाळेला डॉ. प्रसाद देवधर यांच्या पुढाकाराने विविध प्रकारे मदतीचा हात दिला जात आहे. त्या अंतर्गत लांब अंतरावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची पायपिट थांबावी, त्यांना वेळेत शाळेत पोचता यावे यासाठी दहा विद्यार्थ्यांना सायकली वाटप करण्यात आल्या आहेत. तर
शालेय परिसर सदोदित प्रफुल्लित रहावा यासाठी शालेय परिसरात असलेली नारळाची झाडे व शालेय बाग यांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन व्यवस्था, झाडांना खत व इतर कृषी साहित्य प्रतिष्ठानमार्फत पुरविण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रशालेत कुकुटपालन प्रशिक्षण व पक्षी वितरणाचा कार्यक्रमही भगीरथच्या माध्यमातून तिथे होत आहे. इतेकेच नव्हे तर विद्यार्थ्याच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा व विद्यार्थ्यांना संगिताची आवड निर्माण व्हावी , यासाठी यापूर्वीच एक हार्मोनियम, तबला व इतर साहित्य भगीरथ ने त्या शाळेला दीले होते. आता त्याच प्रशालेतील विद्यार्थ्यांना चित्रकला व संगिताची विशेष आवड निर्माण झाली. त्यामुळे एक पाऊल पुढं टाकत श्री. देवधर यांनी 'शकुंतला रामेश्वर अग्रवाल कलादालन' यांच्यामार्फत दिलेल्या दोन लाख पन्नास हजार रुपये निधितून कला दलानाचे सुसज्ज नुतनीकरण करण्यात आले आहे. येत्या बुधवारी 23 सप्टेंबरला या कलादालनाचे उद्घाटन माध्यमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. निश्चितच कला साधनेसाठी विद्यार्थ्यांना याचा उपयोग होणार आहे. डॉ.प्रसाद देवधर यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन शाळेचे माजी विद्यार्थीही शाळेच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी मदतीचा हात पुढे करत आहेत. शाळेसाठी आवश्यक असलेली सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय, स्वच्छतागृह व इतर गरजा सर्वाच्या सहकार्याने पूर्ण होतील याची खात्री आहे.
भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान करत असलेल्या सहकार्याबद्दल पोईप सर्कल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनिल कांदळकर, सर्व संस्था पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक विकास कुंभार, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, सर्व आजीमाजी विद्यार्थी व पालक यांनी श्री. देवधर यांचे विशेष आभार मानले आहेत.