
चिपळूण : गेेल्यावर्षी चतुरंग 'प्रतिष्ठान'ने सुवर्ण महोत्सवी टप्पा पार केला. आणि सोबतच चिपळूण शाखेचा रौप्य महोत्सव देखील दिमाखात साजरा केला. चतुरंगच्या आस्वादयात्री वार्षिक सभासद योजने अंतर्गत, सन २०२४-२५ मध्ये आतापर्यंत तीन सर्वांगसुंदर कार्यक्रमांचा आस्वाद रसिक प्रेक्षकांनी घेतला.
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच या योजनेतील चौथे पुष्प चतुरंग कडून गुंफले जाणार आहे. आणि ते चिपळूणकर रसिकांच्या आवडीच्या नाट्यसंगीत व अभंग- भक्ती संगीताच्या मैफिलीने. हे पुष्प गुंफणार आहेत नांदेडचे ख्यातकीर्त ज्येष्ठ गायक धनंजय जोशी . गायक धनंजय जोशींनी वयाच्या पाचव्या वर्षापासून संगीत शिक्षणाचा श्रीगणेशा केला तो पं.कमलाकर परळीकर यांचेकडे. पुढे जाऊन किराणा घराण्याचे पं. रमेश कनोळे यांचेकडे शास्त्रीय गायनाचे धडे गिरविले. त्यानंतर आज तागायत ते पं. अजय पोहनकर यांचेकडे तालीम घेत आहेत. विविध घराण्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गुरूंकडे शिक्षण घेतल्यामुळे आपसूकच त्यांच्या गायकीमध्ये तिन्ही घराण्यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या गायनातून अनुभवायला मिळतो.
सुरेल आवाज, साफ ताना, सहज सुंदर लयकारी ही त्यांच्या गायकीची वैशिष्ट्ये आहेत.
गायक धनंजय जोशी यांनी आपल्या शास्त्रीय गायना चा पाया भक्कम केला आणि मग ते वळले नाट्य संगीताकडे. त्यांचे गुरु पंडित रमेश कनोले यांनी त्यांना सर्वप्रथम संगीत नाटकात भूमिका करण्याची संधी दिली. संगीत नाटकातील प्रवेशा च्या स्पर्धेमध्ये त्यांनी धैर्यधाराची भूमिका वठवली. त्यांचा कसदार अभिनय व गायन प्रतिभा पाहून कै.जयमाला शिलेदार याही प्रभावित झाल्या. अभिनेते विजय गोखले यांनी त्यांना संगीत स्वर सम्राज्ञी या नाटकासाठी पाचारण केले. यातून देखील त्यांनी आपल्या गायन व अभिनय निपुणतेचा ठसा उमटवला. संगीत मृग रंजनी या नाटकातील बैजूच्या भूमिके बद्दल पं. रामदास कामत यांनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
देश विदेशात अनेक ठिकाणी त्यांनी आपली गायन सेवा रुजू केली आहे. तसेच त्यांच्या गायन क्षेत्रातील कामगिरीबद्दल अनेक पुरस्कारांनी देखील त्यांना गौरवान्वित करण्यात आले आहे. पुण्यातील एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात
भौतिक शास्त्राचे प्राध्यापक असणारे धनंजय जोशी मानवाला ईश्वराशी जोडणारे संगीत हे सर्वात प्रभावी माध्यम आहे असे मानतात. गुरुवार दि २ जानेवारी २०२५ रोजी रात्री ९.३०वा. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रांमध्ये हा स्वराविष्कार सर्व चिपळूणकर रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. आस्वादयात्रीतील सभासदांनी ३१ डिसेंबर २०२४ पासून स.१२ ते ६ या वेळेत आपले सभासद कार्ड दाखवून चतुरंग कार्यालयातून आपले आसन क्रमांक आरक्षित करावेत तसेच आस्वाद यात्री सभासदांना व्यतिरिक्त रसिक प्रेक्षकांसाठी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे प्रवेशिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत असे आवाहन चतुरंग प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे.