भरपावसात 'वायरमन' ऑनफिल्ड व्यस्त !

महावितरणचे अधिकारी बनलेत सुस्त !
Edited by: विनायक गावस
Published on: June 23, 2023 18:42 PM
views 144  views

सावंतवाडी : दडीमारून बसलेल्या पावसानं शुक्रवारी सायंकाळी जोरदार कमबॅक केलं. या पावसाच्या तडाख्यात संचयनी पॅलेस समोरील रूमडाची फांदी वीजेचा मेन लाईनवर पडली. फांदी पडून स्पार्किंग झाल्यानं बत्ती गुल्ल झाली. दरम्यान, या मार्गावरून जाणाऱ्या एका व्यक्तीचा सुदैवानं जीव बचावला. केवळ दैव बलवत्तर म्हणून कोणतीही हानी झाली नाही. 


शहरातील संचयनी पॅलेससमोर आरपीडी रोड येथे ही रूमडाची फांदी तुटून पडली. तुटलेली फांदी थेट मेन लाईनवर पडल्यानं स्पार्किंग होऊन बत्ती गुल्ल झाली. याचवेळी रस्त्यावरून जाणारा एक प्रवासी सुदैवानं बचावला. केवळ दैव बलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला. दरवर्षी पावसाआधी महावितरण कडून लाईनवर आलेल्या झाडाच्या फांद्या तोडल्या जातात. मात्र, यंदा जून संपत आला तरी महावितरणचा कारभार रामभरोसे सुरू आहे. पावसाआधी लाईनवरील फांद्या तोडण गरजेच असताना जबाबदार अधिकारी स्वस्त आहेत. यामुळे नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे.


हा परिसर मुख्य बाजारपेठेत असुन देखील महावितरणनं दुर्लक्ष केलं आहे. शाळा, कॉलेज, मार्केट आदी याच परिसरात असून हे रहदारीच ठिकाण आहे. महावितरणच्या बेजबाबदार पणामुळे मनुष्यहानी झाल्यास जबाबदार कोण ? असा सवाल नागरिकांकडून केला गेला आहे. 


दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच महावितरणचे वायरमन अर्थात जनमित्र भरपावसात घटनास्थळी दाखल झाले. मेन लाईनवर पडलेली फांदी पावसात भिजत त्यांनी दुर करत कर्तव्य बजावलं. यानंतर विद्युत पुरवठा पुन्हा सुरळीत झाला. परंतु, पावसाआधी लाईनवरील फांद्या तोडण्याची ज्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे ते नेमकं करतायत काय ? त्यांच्या जबाबदारीची जाणीव होणार तरी केव्हा ? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.