वेंगुर्लेत २६ - ३० डिसेंबरमध्ये हिवाळी खेळ प्रशिक्षण शिबिर

Edited by: दिपेश परब
Published on: December 26, 2024 12:14 PM
views 65  views

वेंगुर्ले : वेंगुर्ला नगरपरिषद आणि सिंधुदुर्ग डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने दि. २६ ते ३० डिसेंबर २०२४ दरम्याने वेंगुर्ला येथे इंडियन ऑईल पुरस्कृत हिवाळी खेळ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये कॅरम, टेबलटेनिस, बॅडमिंटन व ब्रिज या खेळांचा समावेश आहे. या शिबीरासाठी इंडियन ऑईलचे आंतराष्ट्रीय खेळाडू तज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित रहाणार आहेत. कॅरम प्रशिक्षक श्री. योगेश परदेशी ३ वेळा विश्वविजेतेपदासह ७० आंतरराष्ट्रीय पदके मिळवणारे जगातील एकमेव खेळाडू आहेत. बॅडमिंटन प्रशिक्षक दिपांकर भट्टाचारजी दोन वेळा ऑलिंपिक मधे भारतातर्फे सहभागी झालेले आहेत. टेबलटेनिस प्रशिक्षक श्रीम. इंदू आणि कांचन बसाक ह्या दोघीही राष्ट्रीय विजेत्या आहेत, तर ब्रीज प्रशिक्षक श्री. उदय बेडेकर हे भारतातर्फे सार्क स्पर्धेमधे सहभागी आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना ही सुवर्णसंधी इंडियन ऑईलच्या सौजन्याने उपलब्ध झाली आहे.

या संधीचा फायदा जास्तीत जास्त किशोर वयीन मुला मुलींनी करून घ्यावा असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी पारितोष कंकाळ, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, सिंधुदुर्ग डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुधीर भणगे यांनी केले आहे. कॅम्पसंदर्भात अधिक माहितीसाठी योगेश फणसळकर ७६२०७५५७६६ यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.