सत्ताधाऱ्यांना जाग आणणार | ठाकरे शिवसेना काढणार भव्य मोर्चा !

जिल्हाप्रमुख सतिश सावंत यांची माहिती
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 15, 2023 19:55 PM
views 119  views

वैभववाडी : महागाईने सर्वसामान्य जनता होरपळत आहे. शेतक-याच्या मालाला हमीभाव नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. जनता या सरकारमुळे त्रासलेली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना जाग आणण्यासाठी लवकरच ठाकरे शिवसेनेच्यावतीने तालुक्यात मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहीती शिवसेना जिल्हाप्रमुख सतिश सावंत यांनी दिली.

उध्दव ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्याची बैठक येथील वृंदावन रिसॉर्टवर झाली. या बैठकीला आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते अतुल रावराणे, युवा नेते संदेश पारकर, सुशांत नाईक तालुकाप्रमुख मंगेश लोके, दिगबंर पाटील स्वप्नील धुरी, नलिनी पाटील, दिव्या पाचकुडे, संजय चव्हाण, श्रद्धा रावराणे, सानिका रावराणे, मानसी सावंत आदी उपस्थित होते.

जिल्हाप्रमुख श्री.सावंत म्हणाले गॅसचे दर वाढले आहेत, खते, बियाण्यांच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. काजुला हमीभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. त्यामुळे या प्रश्नाबाबत सरकारला जाग आणणे आवश्यक असल्याने मोर्चा काढण्यात येईल. याशिवाय करूळ घाटरस्ता दुरूस्तीसाठी कोट्यावधी रूपयांच्या निधी आणल्याचे सांगीतले जाते, परंतु प्रत्यक्षात या रस्त्याची अवस्था बिकट आहे, जमीनमालकांना मोबदला न देता धरणांची कामे सुरू आहेत. तर अरूणा प्रकल्पांच्या कालव्यांची कामे निकृष्ट पध्दतीने सुरू आहेत. यासंदर्भात देखील शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे श्री.सावंत यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, आपण पदाधिकारी असो किंवा नसो एक शिवसैनिक म्हणुन नव्या उमेदीने आपण पक्षबांधणीचे काम केले पाहीजे. आपसातील हेवेदावे बाजुला सारून पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी सर्वानी एकत्र येण्याची गरज आहे. संघटितपणे काम केल्यास आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. २० एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय जनसंपर्क दौरे होणार आहेत. त्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खासदार विनायक राऊत यांचा मतदारसंघ निहाय दौरा निश्चित केला आहे. वैभववाडी शहरातील स्टॉलधारक जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पाठीशी निर्भीडपणे उभे राहिले तर स्टॉलधारकांना देखील न्याय मिळवून देण्याचे आश्वासन सतीश सावंत यांनी दिले.