लोकसभेला मताधिक्य मिळवलेला मतदारसंघ भाजपा सोडणार का..?

Edited by:
Published on: October 07, 2024 13:52 PM
views 457  views

सिंधुदुर्ग : विशेष प्रतिनिधी : भाजपाचे नेते माजी  खासदार निलेश राणे हे शिवसेना शिंदे गटात जाणार या चर्चानी कोकणासह राज्यभरात वादळ उठले आहे. महायुतीत हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला सुटणार अशा चर्चानी जोर धरला आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीत कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघात भाजपाला 26,236 चे मताधिक्य मिळालेला मतदार संघ आणि शतप्रतिशतचा नारा देणारा भाजपा हा मतदारसंघ सहजा सहजी सोडणार का हा प्रश्न आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपावरून बैठकांवर बैठका होत आहेत. प्रत्येक पक्ष आपापल्या मतदारसंघावर दावा ठोकत आहे. राज्यात हे चर्चेचे गुऱ्हाळ सुरु असताना भाजपाचे नेते माजी खासदार निलेश राणे हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली. महायुतीत कुडाळ - मालवण विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटाला मिळणार अशाही चर्चाना उधाण आले. अन् कोकणातील राजकारण ढवळून गेले. या चर्चात हा मतदार संघ कुणालाही सुटला तरी महायुतीचे कुडाळ मालवण मतदार संघाचे उमेदवार हे निलेश राणेच असणार यावर महायुतीच्या नेत्यांनी शिक्कामोर्तब केले. 

तळकोकणात शिवसेना शिंदे गटाची फारशी ताकद नाही. त्यात कुडाळ मालवण मतदार संघात शिंदे गटाचे कार्यकर्ते किती हा देखील प्रश्न आहे. शिंदेनी जरी उद्धव ठाकरेंना सोडचिट्ठी दिली असली तर तळकोकणातील बहुतांश कार्यकर्ते हे उद्धव ठाकरेंसोबतच असल्याचे चित्र आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने भाजपचे उमेदवार नारायण राणे यांचा प्रचार केला नसल्याचे भाजपाच्या गोटात बोलले जात आहे. रत्नागिरीत तर कामच केले नाहीत असा आरोप भाजपने उघड उघड केला. सिंधुदुर्गात मंत्री दीपक केसरकर सोडले तर अन्य ठिकाणी शिंदे गटाने काम नं केल्याचा आरोप भाजपा कडून होतं आहे. असं असतानाही भाजपाने कुडाळ - मालवण विधानसभा मतदार संघात 26,236 मताधिक्य मिळवले. उबाठाचे आमदार असेलेल्या मतदार संघात एवढे लीड मिळाल्याने भाजपा कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. 

तरीही भाजपा हामतदार संघ शिंदे गटाला सोडणार ?

राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीत हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला जाणार होता. किरण सामंत हे उमेदवार म्हणून इच्छुक देखील होते आणि मतदार संघात कामही करत होते. तरीही मंत्री नारायण राणे, मंत्री रवींद्र चव्हाण यांनी हा मतदार संघ भाजपाकडे खेचून आणला. कुडाळ - मालवण विधानसभा मतदार संघात तर शिवसेना शिंदे गटाची तर म्हणावी तशी ताकद नाही. तळागाळात संघटना देखील मजबूत नाही. शिवाय लोकसभा निवडणुकीत भाजपाला या मतदार संघात तब्बल 26,236 मताधिक्य मिळाले. गेले अनेक वर्षे माजी खासदार निलेश राणे हे या मतदार संघात काम करत आहेत. मतदार संघात ठेवलेला जनसंपर्क आणि केलेल्या विकासकामांच्या जोरावर भाजपला या मतदार संघात यश मिळाले हे नाकारून चालणार नाही. असे असताना भाजपा हा मतदार संघ शिवसेना शिंदे गटाला का सोडणार हा प्रश्न आहे. भाजपाची संघटना तळागाळात मजबूत असताना भाजपा एवढी मोठी रिस्क घेणार ? एकीकडे शत प्रतिशत भाजपा असा नारा देणारा आणि भविष्यात स्वबळावर निवडणुका लढविण्याचे स्वप्न पाहणारा भाजपा हातचा मतदार संघ सोडणार का? असा प्रश्न आता उपस्थित होतं आहे. 

उमेदवार फिक्स तर भाजपा का नको?

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यावर महायुतीच्या नेत्यांनी शिक्कामोर्तब केले. शिंदे गटाला जागा सुटली तरी निलेश राणेच आणि भाजपाचा जागा. मिळाली तरी निलेश राणेच उमेदवार हे महायुतीने निश्चित केले आहे. असे असताना भाजपकडून निलेश राणे का नको अशीही चर्चा रंगत आहे. त्यामुळे  निलेश राणे काय करणार? खासदार नारायण राणे, मंत्री रवींद्र चव्हाण यांची भूमिका काय? शिवाय निलेश राणे शिवसेना शिंदे गटात जाणार या चर्चेवर एकाही बड्या नेत्याने जाहीरपणे काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे महायुतीचे फिक्स असलेले उमेदवार निलेश राणे कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.