सिंधुदुर्गातील सहकारी संस्था व विकास संस्थाना बळकटी देणार..!

प्रशिक्षण केंद्र व अर्थसाहाय्यासाठी प्रयत्न करू : के. व्ही. शाजी.
Edited by:
Published on: February 16, 2024 13:27 PM
views 70  views

सिंधूदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  काजू उत्पादकांना सक्षम करण्यासाठी व काजुला चांगला दर मिळण्यासाठी सिंधुदुर्गातील  "विकास सेवा संस्थांना" नाबार्डने सहाय्य करावे व नाबार्डचे एक प्रशिक्षण केंद्र  सुरू करावे  या मागणीकडे  सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे तज्ञ संचालक आमदार नितेश राणे व जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले नाबार्डचे राष्ट्रीय अध्यक्ष के. व्ही. शाजी यांनी या मागणीला प्रतिसाद देत  जिल्ह्यातील विकास संस्था व सहकारी संस्थांना बळकटी देण्यासाठी  केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचा प्रयत्न सुरूच आहे  व  अर्थसाह्य देण्यासाठी नाबार्डचे प्रमुख अधिकारी  अभ्यास करून योजना बनवतील अशी ग्वाही त्यांनी दिली.

काजू व जिल्ह्यातील शेती उत्पादने  शेतकरी, खरेदी विक्री संघ विकास संस्था जिल्हा बँक आधी सहकार क्षेत्राला बळकटी देणे  शेतकरी उत्पादकाना चालना देणे या दृष्टीने  नाबार्डचे अध्यक्ष के. व्ही. शाजी यांनी या बैठकीत येथील प्रश्न जाणून घेतले. बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, आमदार नितेश राणे, नाबार्डच्या मुख्य महाप्रबंधक श्रीम. रश्मी दराद, महाप्रबंधक डॉ. प्रदिप पराते, नाबार्डचे जिल्हा प्रबंधक अजय थुटे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रमोद गावडे, बँकेचे अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते. बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन निलेश पवार यांनी केले.

गेल्या चाळीस वर्षात जिल्हा बँकेने केलेली प्रगती लक्षणीय असून पुढील काळात स्पर्धात्मक वातावरणामुळे जिल्हा बँकाना विविध आव्हांनाना सामोरे जावे लागणार आहे. यासाठी विविध क्षेत्रातील संधींचा सुयोग्य वापर करणे आवश्यक आहे. चांगले ग्राहक येण्यासाठी चांगली सेवा देणे आवश्यक असून याकरीता विविध डिजीटल माध्यमांतील नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या सेवा देत असतांना सायबर सुरक्षेची काळजी घेणे खुप गरजेचे असल्याचे मत नाबार्डचे अध्यक्ष के. व्ही. शाजी यांनी आज जिल्हा बँकेच्या भेटीच्या वेळी व्यक्त केले.

यावेळी उपस्थितांना जिल्हा बँकेने केलेल्या प्रगतीची चित्रफीत, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सादर करण्यात आले. त्यानंतर बँकेच्या व्हॉट्स ॲप बँकिंग व कॉर्पोरेट ॲपचे लोकार्पण करून दुधाळ जनावरे, मत्स्य व्यवसाय, पिक कर्ज, पी.एम.एफ.एम.ई. या योजनेअंतर्गत कर्ज मंजुर सभासदांना प्राथमिक स्वरुपात कर्ज मंजुर पत्रक व किसान क्रेडीट कार्डचे वितरण करण्यात आले. 

यावेळी मार्गदर्शन करतांना नाबार्डचे अध्यक्ष के. व्ही. शाजी म्हणाले की, ज्या स्थानिक उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. अशा उत्पादनांना कर्जपुरवठा करुन आपला व्यवसायातील सहभाग वाढवण्यासाठी नाबार्ड जिल्हा बँकांना सर्वतोपरी मदत करेल असे सांगून बँकेच्या विविध आकडेवारीचे विश्लेषण करत बँकेला बहुमोल असे मार्गदर्शन केले.