
देवगड : नाट्यगृहासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याबद्दल मंत्री नितेश राणे यांच्या कडून सांगण्यात आले आहे.देवगड तालुक्याला नाट्य कलेचा मोठा वारसा आहे.ही नाट्य कला व नाट्य कलाकार जगवायचा असेल अथवा त्यादृष्टीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी देवगड- जामसंडे शहरात नाट्यगृह उभारण्यात यावे,अशी मागणी युथ फोरम- देवगड या संस्थेच्यावतीने अध्यक्ष ॲड.सिद्धेश माणगांवकर यांनी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांच्याकडे केली आहे.
युथ फोरम- देवगड या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अध्यक्ष ॲड. सिद्धेश माणगांवकर यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री नीतेश राणे यांची त्यांच्या कणकवली येथील निवासस्थानी नुकतीच भेट घेतली. यावेळी ॲड. माणगांवकर यांनी देवगड- जामसंडे येथे नाट्यगृह उभारण्याबाबत पालकमंत्री राणे यांना निवेदन दिले.ॲड. माणगांवकर यांनी निवेदनात म्हटले आहे, देवगड तालुक्याला नाट्यकलेचा मोठा वारसा आहे. सध्या आपल्या देवगडमध्ये अनेक युवकांनी नाट्यक्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. अनेक विद्यार्थी व युवक नाट्य कलेत आपले करिअर घडवू इच्छितात. आपल्या सहकार्यातून व युथ फोरम संस्थेच्या माध्यमातून यावर्षी नाट्य महोत्सवदेखील आयोजित करण्यात आला होता. या नाट्य महोत्सवामध्ये तालुक्यातील सुमारे १०० हून अधिक कलाकारांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे ही नाट्यकला व नाट्य कलाकार जगवायचा असेल अथवा त्यादृष्टीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी देवगड- जामसंडे शहरात नाट्यगृहाची निर्मिती होणे काळाची गरज आहे. जेणेकरून नाट्य कलाकार व नाट्य कलेला देवगड तालुक्यात अधिक चालना मिळेल. नाट्य चळवळीतील प्रत्येक कलाकारांना आपले सहकार्य मिळत असून देवगड, जामसंडे शहरात नाट्यगृह उभारण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, पालकमंत्री राणे यांनी युथ फोरमच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून नाट्यगृह निर्मितीसाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे ॲड. माणगांवकर यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत युथ फोरमचे सहसचिव ऋत्विक धुरी, देवगड- जामसंडे शहर कमिटी अध्यक्ष ओंकार सारंग, देवगड कॉलेज युनिट अध्यक्ष दीपक जानकर, सलोनी कदम, दीप नलावडे, शुभम महाजन, अभिषेक वडार आदी पदाधिकारी उपस्थित होते.