
सावंतवाडी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सावंतवाडी शहरात विविध विकासकामांची भुमिपूजन पार पडली. मुख्यमंत्री सावंतवाडीत येणार असल्यानं अनेक अपेक्षा जनतेन व्यक्त केल्या होत्या. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यटन, उद्योग व आंबा-काजू पिकांच्या माध्यमातून कोकणात रोजगार निर्मितीवर भर देणार, आरोग्यासारख्या प्रश्नासाठी आमचं सरकार कटीबद्ध आहे. येत्या काळात ''जगाला हेवा वाटेल असा कोकण घडवणार'' असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.
कोकण ही निसर्गाचा वरदहस्त लाभलेली भूमी आहे. 'येवा कोकण आपलाच आसा' असं म्हणून कोकणी माणसांमध्ये स्वभाव संस्कृतीचा गोडवा जपत पाहूणचार करण्याची आगळीवेगळी परंपरा आहे. त्यामुळेच महाराष्ट्राची पर्यटन पंढरी अशी ओळख असलेल्या या कोकणभूमीसाठी स्वतंत्र 'कोकण विकास नियोजन प्राधिकरण ' निर्माण केले जात आहे. या प्राधिकरणच्या माध्यमातून कोकणच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळेल व पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होऊन कोकण खऱ्या अर्थाने समृद्ध होईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
दरम्यान, कारागिरांची भूमी म्हणून ओळख असणाऱ्या सावंतवाडी शहरातील कारागिरांच्या हाताला बळ देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून सावंतवाडीच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत केली जाईल. मल्टिस्पेशालिटीचा प्रश्न सुटेल आरोग्य सुविधा देण्यासाठी आमचं सरकार कटीबद्ध आहे असं ते म्हणाले. तर रोजगार निर्मितीसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून येथील नागरिकांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याचे ते म्हणाले.
चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव देण्यात आलं आहे.
सिंधुदुर्ग मुंबई हा वेगवान ग्रीनफिल्ड रस्ता लवकरच मार्गी लागणार आहे. वंदे भारत या अति जलद रेल्वेमुळे कोकणाच्या पर्यटन विकासाला हातभार लागेल. यासाठी ज्या ज्या पायाभूत सुविधा आवश्यक आहेत त्या राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच पूर्ण केल्या जातील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सावंतवाडी शहरातील नगरपालिकेच्या संत गाडगेबाबा भाजी मंडई व शॉपिंग कॉम्प्लेक्ससह विविध प्रकल्पांच्या भूमिपूजनप्रसंगी उपस्थित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य केले आहे. यापुढेही आपण व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊ अस आश्वासन दिले.
यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, आमदार भरत गोगावले, आमदार रवींद्र फाटक, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, नागरी समिती अध्यक्ष युवराज लखमराजे भोंसले, महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष किरण ठाकूर आदी उपस्थित होते.