चिपी विमानतळाला 'बॅरिस्टर नाथ पै' यांचे नाव देण्याबाबत सरकारकडे मागणी करणार

जेष्ठ अर्थतज्ञ, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर
Edited by: गुरुप्रसाद दळवी
Published on: September 24, 2022 18:46 PM
views 121  views

कुडाळ : कोकण मराठी साहित्य परिषद, सिंधुदुर्ग आयोजित बॅरिस्टर नाथ पै जन्मशताब्दी अभिवादन सभा आज कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी या सभेचे प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री, जेष्ठ पत्रकार, राज्यसभा सदस्य कुमार केतकर, प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ अर्थतज्ञ, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर, कोमसाप अध्यक्ष नमिता कीर, कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ, कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, तालुकाध्यक्ष वृंदा कांबळी, कवी आनंद वैद्य, अदिती पै, नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या 'मी असा घडलो' या आत्मचरित्राच्या पहिल्या भागाच्या १६ आवृत्तीचे आणि 'मी असा जगलो' या दुसऱ्या भागाच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन जेष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी मराठी माणूस मराठी माणसालाचा समजू शकला नाही, अशी खंत व्यक्त करताना बॅरिस्टर नाथ पै हे उत्तम संसदपटू होते. नाथ पै यांचे व्यक्तिमत्व हे अलौकिक होतं. नाथ पै यांना सुसंस्कृत भारत निर्माण करायचा होता, असेही ते म्हणाले. 

  तर सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाला 'बॅरिस्टर नाथ पै आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे नाव द्यावे, अशी मागणी आपण सरकारकडे करणार असल्याचेही माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी सांगितले. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जेष्ठ पत्रकार, राज्यसभा सदस्य कुमार केतकर यांनी नाथ पै यांनी आपल्या पुस्तकात देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेते असल्याचा उल्लेख केला आहे. तसेच पंतप्रधान पंडित नेहरूंना सुद्धा नाथ पै यांच्याबद्दल आदर होता. परंतु, नाथ पै यांच्या कामाची दखल घेतली गेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.