संच मान्यतेचे निकष बदलण्यासाठी सहकार्य करणार

मुख्याध्यापक महामंडळाच्या अधिवेशनात उद्योगमंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन
Edited by: मनोज पवार
Published on: April 15, 2025 11:31 AM
views 214  views

दापोली :  महाराष्ट्रातील शाळांना मारक असणाऱ्या नवीन संच मान्यतेचे निकष बदलण्याकरिता शासन दरबारी सर्वतोपरी सहकार्य करणार असून मुख्याध्यापक महामंडळाच्या बरोबरीने  मुख्याध्यापकांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या 63 व्या अधिवेशना निमित्त ते बोलत होते. ते पुढे म्हणाले आज महाराष्ट्रातील मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यासमोर कोणते प्रश्न उभे आहेत याची जाणीव मला  आहे. टप्पा अनुदानावर असणाऱ्या शिक्षकांचा व मुख्याध्यापकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कटीबद्ध असून पुढील टप्पा वाढ नियमितपणे कशी होईल याकडे लक्ष देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जुनी पेन्शन योजना देण्यासाठी देखील सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेले बहुसंख्य मुख्याध्यापक पाहता मी कायमच मुख्याध्यापक महामंडळाच्या सोबत असल्याचा आनंद आपल्याला होत आहे. मात्र आपणही असेच बहुसंख्येने पाठीशी असल्याचे पोस्टल मतदानाने दाखवून द्यावे असे मिश्किल पणे त्यांनी सांगितले. माझी आई माध्यमिक शिक्षिका असल्यामुळे मी माध्यमिक शिक्षकांच्या तालमीत घडलेला आहे. मराठी माध्यमाच्या शाळेमधून शिक्षण घेऊ नये राज्याचे नेतृत्व करण्याची संधी आपल्या सर्वांच्या सहकार्याने मिळाली यातूनच माध्यमिक शिक्षण किती महत्त्वाचे आहे हे दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योग मंत्री म्हणून परदेशात गेल्यावरही मराठी माध्यमाच्या शाळेत शिकल्याचे अभिमानाने सांगत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या अधिवेशनामध्ये प्रथम अधिवेशन अध्यक्ष सुनील पंडित यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाकडून महाराष्ट्रात सीबीएसई पॅटर्न केंद्रीय व राज्य शिक्षण मंडळ तुलनात्मक अभ्यास या विषयावर निबंध वाचन झाले. मुख्याध्यापकांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा झाल्यानंतर पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने गुणवत्ता संवर्धन अभियान या विषयावर निबंध सादरीकरण करण्यात आले. यावेळी महामंडळ माजी अध्यक्ष अरुण थोरात पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर यांनी चेअर पर्सन म्हणून मार्गदर्शन केले.

डॉक्टर बी एम हिरडेकर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि मुख्याध्यापक यांची भूमिका या विषयावर व्याख्यानाच्या माध्यमातून विचार प्रकट केले. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून दोन पुरुष व एक महिला मुख्याध्यापकांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. खुल्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र शासनाला शैक्षणिक प्रश्न ठरावाच्या माध्यमातून देण्याचे निश्चित करण्यात आले. सर्व ठरावांचे वाचन करून पुढील वर्षभरात त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन मुख्याध्यापक महामंडळाचे अधिवेशन अध्यक्ष सुनील पंडित मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने यांनी दिले.

याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य मंत्री योगेश कदम, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, महामंडळाच्या अधिवेशनाचे अध्यक्ष सुनील पंडित, मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने, माजी अध्यक्ष सुभाष माने, अरुण थोरात, जे. के. पाटील सचिव नंदकुमार सागर, उपाध्यक्ष डॉ. डी एस घुगरे आर. व्ही. पाटील, गोपाल पाटील, कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर वामन तर्फे, मुख्याध्यापक महामंडळाचे कोशाध्यक्ष संदेश राऊत,  सहसंपादक रमेश तरवडेकर, सुनील भोर, संजय कुमार झांबरे, राज्य प्रवक्ता प्रसाद गायकवाड, मुकेश पाटील, डॉ बी बी पाटील, संजय पाटील, माजी सचिव आदिनाथ थोरात, शांताराम पोखरकर, रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आयुब मुल्ला, उपाध्यक्ष संजय चव्हाण, सचिव महेश पाटकर, खजिनदार सुनील देशमाने, अनंत साठे, राजश्री नारे, अनंत साळवी, रामचंद्र कापसे, श्रीशैल्य पुजारी, दापोली तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संतोष हजारे, सचिव सुनील देसाई, प्रशांत खेडेकर, मंगेश गोरिवले, संजय वाघमारे, शंकर गलांडे, संदेश कांबळे, महावीर कुसनाळे आदी मान्यवर उपस्थित होते.