
सावंतवाडी : कोकणात पावसाळ्याच्या सुरुवातीला आढळणाऱ्या रानभाज्या या वैविध्यपूर्ण असून आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्यांच्यातील औषधी गुणधर्मामुळे आपल्या आरोग्याचे संवर्धन होते. त्यासाठी या अशा रानभाज्यांच्या प्रसारासाठी त्यांचे प्रदर्शन आणि त्यांच्या पाककृतीचे सादरीकरण होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन प्रतिभा पाटणकर यांनी केले. संत महाराज महाविद्यालयामध्ये महिला विकास कक्ष, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि वनस्पती शास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील रानभाज्यांचे प्रदर्शन आणि त्यांच्या पाककृती सादर केल्या होत्या. सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून विशेष कौतुक केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ए. एन. लोखंडे यांनी रानभाज्यांचे आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे स्थान आजच्या पिढीने समजून घेतले पाहिजे. जंक फूडपासून दूर राहून निसर्गाच्या सानिध्यात सहज उपलब्ध होणाऱ्या अशा रानभाज्यांचेही महत्त्व आपल्या आहारात कसे आहे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयातील वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ.रवींद्र ठाकूर यांनी आपल्या अवतीभवतीच्या परिसराकडे विद्यार्थ्यांनी डोळसपणे पाहिले पाहिजे. आपल्या आरोग्याला आवश्यक असणाऱ्या अनेक गोष्टी या आपल्या अवतीभवती असतात. त्यापैकी रानभाज्या म्हणजे आपल्या आरोग्यासाठी वरदान आहे. हा ठेवा पुढच्या पिढीने सांभाळला पाहिजे असे सांगितले. या रानभाज्यांच्या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी दुर्मिळ रानभाज्यांसहित अतिशय कल्पक, अभिनव अशा पाककृतींचेही सादरीकरण केले. त्याला महाविद्यालयातील सर्वांनी अतिशय भरभरून प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत महिला विकास कक्षाच्या समन्वयक डॉ. शरयू असोलकर यांनी केले. तर आभार राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक प्रा. यू.एम.कामत यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या अंतर्गत हमी कक्षाचे समन्वयक आणि हिंदी विभाग प्रमुख कॅप्टन डॉ. एस .टी. आवटे डॉ. व्ही जी भास्कर ,डॉ.डी जी चव्हाण डॉ. के एम चव्हाण,प्रा. संतोष वालावलकर, प्रा. प्रज्ञा सावंत, प्रा.योगिता वाईरकर ,प्रा. स्वप्नजा चांदेकर ,प्रा. काजल मातोंडकर, प्रा. सुवर्णा निकम, प्रा.सोनाली अंगचेकर प्रा. राजगुरू आदी उपस्थित होते.