बांधकामाची घाई कशाला ? ; संतापलेल्या शिंदे गटाचा भाजपवर हल्लाबोल !

खरेदी-विक्री संघात युती आमने-सामने
Edited by: विनायक गांवस
Published on: January 14, 2023 17:30 PM
views 156  views

सावंतवाडी : राज्यात भाजप व शिंदे गटाच सरकार असून युतीधर्म पाळा असे आदेश असताना सावंतवाडीत स्थानिक भाजप नेते युतीधर्म पाळत नसल्याचा आरोप बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या जेष्ठ माजी नगरसेविका आनोरोजीन लोबो यांनी केला आहे. खरेदी-विक्री संघाच्या तज्ञ संचालक निवडणूकीत स्थानिक भाजप नेत्यांनी युती धर्म पाळला नाही. जर असच चालत राहिल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा देत मित्रपक्ष असणाऱ्या भाजपच्या स्थानिक पातळीवर सहकार्य मिळत नसल्याचा जोरदार हल्लाबोल लोबो यांनी केलाय. तर यापुढे खरेदी विक्री संघात शिंदे गटाचे उपाध्यक्ष व सर्व सदस्य विरोधकाची भूमिका निभावतील अस जाहीर केल.


खरेदी-विक्री संघाची निवडणूक भाजप-शिंदे गटात युती करून लढविण्यात आली होती. यावेळी युतीचे सर्व उमेदवार विजयी झाले होते. यामध्ये भाजपचे आठ तर शिंदे गटाचे सात असे सदस्य निवडून आले होते. भाजप गटाचा चेअरमन व शिंदे गटाचा व्हाईस चेअरमन अशी निवड झाली होती. मात्र, तज्ञ संचालक निवडीच्या वेळी युतीत वादाची ठिणगी पडली. भाजप व शिंदे गटाने स्वतंत्र निवडणूक लढवली. यात शिंदे गटाचा पराभव झाला. त्यामुळे संतापलेल्या शिंदे गटाच्या सर्व सदस्यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन स्थानिक भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. 


वरून युतीचे आदेश येतात मात्र, स्थानिक पातळीवरील भाजपच सहकार्य मिळत नाही. असं असेल तर आम्हाला देखील वेगळी भुमिका घ्यावी लागेल असा इशारा देत असतानाच 

तज्ञ संचालक निवडीत दोन्ही उमेदवार देत भाजपन युती धर्म पाळला नाही असा आरोप लोबो यांनी केला. त्या म्हणाल्या, खरेदी-विक्री संघाच्या पहिल्याच बैठकीत भाजपनं मळगावला गोडाऊन बांधायची, बांधकाम सुरू करायची तयारी केली आहे. जागा बघण, पहाणी करुन आढावा घेण आवश्यक आहे. एवढी वर्षे त्याच गोडाउनात भात ठेवत असताना तातडीने गोडाउन बांधायची गरज का पडली ? असा सवाल त्यांनी केला‌. त्या बांधकामाच अजून टेंडर ही काढलेल नाही. हा विषय बैठकीत अजेंड्यावर आला पाहिजे. गोडाउन बांधायच असेल तर त्याची प्रकिया आहे. संचालकांसह चर्चा झाली पाहिजे. सर्व प्रकिया पार पाडण आवश्यक आहे. दरम्यान, ५ लाखाच इंजिनिअरकडुन ईस्टीमेट करून आणल आहे. चुकीच्या पद्धतीने ही प्रकिया सुरू आहे. यापुढे खरेदी-विक्री संघात भाजपला आमचा विरोध राहणार असून जे चुकीच काम करतील त्याना रोखण्याच काम आम्ही करणार,  बहुमत असल म्हणून भाजपला  दादागिरी करू देणार नाही.अजून खरेदी-विक्री संघाचा तुम्ही दरवाजा पाहिला नाही ही दुसरी सभा, लगेच आल्या आल्या बांधकाम कशासाठी ? असा जोरदार हल्लाबोल खरेदी-विक्री संघातील भाजपवर शिंदे गटानं  चढविला आहे.यावेळी खरेदी-विक्री संघ सदस्य अनारोजीन लोबो, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, व्हा. चेअरमन रघुनाथ रेडकर आदी उपस्थित होते.