
सावंतवाडी : महायुतीतील घटक पक्षाचे शिवसेना नेते शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे एकत्र आले यामुळे राजन तेलींना पोटदुखी का झाली ? असा सवाल शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी केला आहे. राजन तेली यांनी राणे-केसरकर भेटीवर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास, रोजगार व शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपापसात न भांडता एकत्रितपणे जिल्ह्याचा विकास करणं काळाची गरज आहे. त्यासाठी कोकणातील हे दोन बडे नेते एकत्र आले आहेत. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची काल भेट घेतली आहे.
दोघांत चांगले संबंत आहेत. यामुळे राजन तेलींच्या पोटात दुखण्याच काही कारण नाही. हे दोघे एकत्र आल्यानं आपलं अस्तित्व राहील की नाही याची भिती राजन तेलींना असेल, त्यामुळेच ते अशी विधानं करत आहेत असा पलटवार अशोक दळवी यांनी केला. तर नारायण राणेंची देखील जिल्हाचा विकास व्हावा हीच भुमिका आहे. त्यामुळे हे दोघे नेते एकत्र आलेत. देश व राज्याप्रमाणे सिंधुदुर्गात खांद्याला खांदा लावून काम केलं तर जिल्ह्याचा विकासाला खीळ बसणार नाही, हीच सर्वांची भुमिका आहे. भेटीवर बोलताना राजन तेलींकडून दहशतवादाचा उल्लेख केला जात आहे. त्यातील काही अनुभव त्यांना असतील म्हणून ते त्यावर बोलत आहेत. परंतु, आता जिल्ह्यात तसं वातावरण राहिलेलं नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी एकदिलानं काम करण्याची भावना नेत्यांची आहे असं मत शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी व्यक्त केलं.