नवनवे महामार्ग सिंधुदुर्गवर का लादले जाताहेत..?

शक्तीपीठ महामार्ग सिंधुदुर्गातील निसर्ग आणि वन्यजीवांसाठी धोकादायक : डॉ. जयेंद्र परुळेकर
Edited by:
Published on: March 13, 2025 13:55 PM
views 1578  views

सावंतवाडी : गेली १७ वर्ष मुंबई-गोवा महामार्ग अर्धवट असताना "एक ना धड भाराभर चिंध्या" या उक्तीप्रमाणे नवनवे महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यावर का लादले जात आहेत ? असा सवाल करत उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी राज्यातील महायुती सरकार तर्फे प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग हा सिंधुदुर्गातील जैवविविध निसर्ग आणि वन्यजीवांसाठी धोकादायक ठरणार आहे असं मत व्यक्त केले आहे. 

डॉ. परूळेकर म्हणाले, पवना ते पत्रादेवी असा ७८० किमी लांबीचा सहापदरी महामार्ग राज्यातील १२ जिल्ह्यातून जाणार आहे. नागपूर ते गोवा असा हा महामार्ग नागरिकांनी, ग्रामस्थांनी मागणी न करता त्यांच्या माथी मारण्याचा घाट घातला जात आहे.  ८६३०० कोटी रूपये एवढा सामान्य जनतेचा कररूपी प्रचंड पैसा हा मोठमोठ्या रोड कंत्राटदारांचे आणि सत्ताधारी राजकारणांचे उखळ पांढरे करणार हे निश्चित आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गेळ ते आंबोली,नेनेवाडी,पारपोली, फणसवडे,फुकेरी,घारपी, तांबोळी,डेगवे, बांदा अशा दहा गावातून प्रस्तावित हा महामार्ग सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यातील जैवविविध निसर्गासाठी घातक ठरेलच. पण, येथील वन्यजीवन मोठ्या प्रमाणावर विस्थापित होऊन आधीच शेती बागायतीसाठी उपद्रव ठरलेल्या गवे, रानडुक्कर इत्यादी वन्यजीवांचा त्रास शेतकरी बागायतदारांना वाढणार आहे. आधीच सतरा वर्षे प्रलंबित असलेला मुंबई गोवा महामार्ग पूर्ण व्हायला अजूनही काही कालावधी असताना "एक ना धड भाराभर चिंध्या" या उक्तीप्रमाणे नवनवे महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यावर का लादले जात आहेत असं मत व्यक्त केले.