महायुतीचा उमेदवार कोण...?

नारायण राणे, किरण सामंत की रवींद्र चव्‍हाण? महाविकासआघाडीची प्रचारात सरशी महायुतीमध्ये धूसपूस सुरुच
Edited by:
Published on: April 07, 2024 14:19 PM
views 596  views

सिंधुदुर्ग | लक्ष्‍मण आडाव : पंधरा दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी संपर्क दौरा सुरु केला तो आजही सुरु आहे. शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार आणि कॉंग्रेस पक्षाच्यावतीने एकत्रितपणे तळागाळात ग्रामीण भागातील गावागावांमध्‍ये प्रचार सुरु आहे. मात्र कांही दिवस प्रचारासाठी शिल्‍लक असतानाही महायुतीच्‍या उमेदवाराची घोषणा होत नाही.

 गेली ३५ वर्ष सिंधुदुर्गासह कोकणावर अधिराज्य गाजवणारे मातब्बर नेते नारायण राणे यांनी उमेदवाराची घोषणा करण्‍याआधीच प्रचार कार्यालयाचे उद्‍घाटन आणि प्रचार सभाही घेण्‍यास सुरुवात केली आहे. एकीकडे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत  आणि जिल्‍ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्‍हाण यांच्‍या नावाची चर्चाही रंगू लागली आहे. त्‍यामुळे महायुतीचा उमेदवार कोण? याबाबतही नाक्‍या नाक्‍यावर बोलले जात आहे. आजपर्यंतचा आढावा घेतला तर प्रचारात महाविकास आघाडीची सरशी दिसत असून महायुतीमध्ये मात्र आजही धुसफूस सुरु  असल्‍याचे चित्र दिसत आहे. 

भाजपने कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायची असे ठरविले आहे त्यासाठी मातब्बर नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निवडणूक रिंगणात उतरवणार आहेत. मागील दोन निवडणुका नारायण राणे हरले असले तरी त्या मागचा इतिहास वेगळा आहे. परिस्थितीही आता बदलली आहे. सध्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासाठी आपण संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढू व मोठे मताधिक्य मिळवून देऊ असे जाहीर केले आहे, त्यामुळे केसरकर-राणे यांच्यामधील सलोख्‍याचे नाते या निवडणुकीत ‘टर्निंग पाॅईंट’ ठरेल काय? हे पहावयास मिळणार आहे.

 लोकसभेनंतर काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने प्रत्येकाला आपल्या भवितव्याची चिंता लागली आहे, त्यामुळे नारायण राणे यांच्या प्रचारासाठी कोणतीही ‘रिस्‍क’ न घेता आपली राजकीय कारकीर्द धोक्यात येऊ नये म्हणून प्रत्येक जण आपली ताकद या निवडणुकीत पणाला लावणार आहे. याचा फायदा या निवडणुकीत नारायण राणे यांना होणार असल्‍याचेही बोलले जात आहे.

महायुतीच्‍या कार्यकर्त्यांमध्ये आजही संभ्रमाचे वातावरण

महायुतीमध्ये शिवसेना पक्षातर्फे इच्छुक उमेदवार म्हणून किरण सामंत यांचे नाव पुढे आले आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना पक्षाचाच उमेदवार असेल असे म्हटले आहे. भाजपातर्फे नारायण राणे प्रचाराला लागले आहेत. भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षामध्ये अजून समन्वय नसल्याने दोन्ही पक्ष कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.