गावचा 'किंग' कोण..?

तळकोकणातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाकडे राज्याचे लक्ष
Edited by: विनायक गांवस
Published on: December 20, 2022 08:09 AM
views 304  views

सावंतवाडी : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल अगदी दोन तासांत हाती येणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले असून १० वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. १० टेबलांवर प्रत्येकी ५ ग्रामपंचायत प्रमाणे ४९ ग्रामपंचायतींची मतमोजणी होणार आहे. यासाठी १०० महसूल कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून बंदोबस्तासाठी पोलीस सज्ज झालेत. निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार अरुण उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे. 

भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना युती, महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होत असून सावंतवाडी तालुक्यात ५२ पैकी ३ ग्रामपंचायती गेळे, नेतर्डे, कुडतरकर टेंब सावरवाड या तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यात. तर ७ सरपंच बिनविरोध निवडून आलेत‌‌. याशिवाय ११२ सदस्य बिनविरोध ठरलेत. झालेल्या निवडणुकीत सरपंच पदासाठी १२५ उमेदवार तर सदस्य पदासाठी तब्बल ६४९ उमेदवार रिंगणात होते. तालुक्यातून एकूण ६४ हजार ३२५ मतदारांपैकी ४७ हजार ८९३  मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये २२ हजार ७५१ महिला तर २५ हजार १४२ पुरुष मतदारांनी मतदान केले. ७४.४५ टक्के एवढ मतदान झालं.

दरम्यान, तालुक्यातील बांदा, माजगाव, नेमळे, कारिवडे, माडखोल या लढती लक्षवेधी ठरल्या आहेत. वेत्ये, न्हावेली, निरवडे, मडुरा, भालावल, चराठा, कुणकेरी आदी ग्रामपंचायतींच्या निकालांकडेही लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे गावचा किंग कोण हे अगदी थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.