कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना वाली कोण..?

Edited by:
Published on: April 25, 2025 19:54 PM
views 30  views

सावंतवाडी : गेले दोन-तीन वर्षापासून साफसफाई  कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. त्यानंतर मागच्याच महिन्यामध्ये कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांवर व  जुन्या कॉन्ट्रॅक्टरने पीएफ विषयी  केलेल्या फसवणुकी संदर्भात संप पुकारला होता. त्यावेळी  शहरातील जनतेला कचरा समस्यांना सामोरे जावे लागले होते. त्यावेळी प्रभारी मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांची सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव व माहिती अधिकारी सुशील चौगुले यांनी त्यांची भेट घेऊन यशस्वी मध्यस्थ केली होती. नंतर सात दिवसांनी संप मागे घेण्यात आला होता. परंतु, काही दिवसातच प्रभारी मुख्याधिकारी कंकाळ यांची बदली नागपूर  येथे झाली आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या  मागण्या पेपरवर तशाच पडून राहिल्या.

पालिका स्वच्छता अधिकाऱ्यांना याची कल्पना देऊन सुद्धा त्यांच्या मागणीची दखल न घेतल्यामुळे पुन्हा 60 कंत्राटी कर्मचाऱ्यांनी  काम बंद आंदोलन पुकारले. त्यामुळे चार दिवस शहरातील स्वच्छता कामामध्ये अडथळे निर्माण होऊ लागले. याचा फटका नगरपालिकेसहित शहरातील जनतेलाही बसला. स्वच्छतेसंदर्भात त्यांची बरीच तारांबळ उडाली होती. अनेकांनी याबाबत स्वच्छता अधिकारी व मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क केला. तर शहरातील नागरिकांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन यावर लवकरात लवकर तोडगा काढा अशी विनंती केली होती.

या आंदोलनामुळे शहरात वाढत चाललेल्या कचऱ्याची दखल घेत तसेच घरचा कचरा साठवणुकीमुळे जनतेचे होत असलेले हाल पाहत त्याचप्रमाणे  कर्मचाऱ्यांच्याही मागणीची दखल घेऊन येथील सामाजिक कार्यकर्ते मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड.अनिल केसरकर, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर, सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव, शिवसेना युवा नेते  प्रतीक बांदेकर, मनसे शहराध्यक्ष राजू कासकर या सामाजिक कार्यकर्त्यांकडून यशस्वी शिष्टाई करून खालील प्रश्न सोडवण्यात आले. त्यामध्ये  मागील चार महिन्याचा कंत्राटी कर्मचाऱ्यांना फरक मिळणार, कारिवडे कचरा डेपोच्या कर्मचाऱ्यांचा EPF चा चेक देण्याची कबुली, कंत्राटी कर्मचाऱ्यांना  पेमेंट स्लिप व कार्ड देणार, नवीन टेंडर प्रमाणे नवीन दर लागू होणार, कचरा गाडीवरील ड्रायव्हर कर्मचाऱ्यांचा PF चा प्रश्न पुढच्या महिन्या अखेरी मार्गी लागणार हे प्रमुख प्रश्न मिटले. तसेच येथील सामाजिक कार्यकर्ते महेश पांचाळ यांनी कंत्राटी कर्मचारी दुसऱ्यांच्या आरोग्याचा विचार करून शरीरातील कचरा साफ करतात त्याचप्रमाणे त्यांच्याही  आरोग्याचा पालिकेकडून विचार झाला पाहिजे. तसेच कचरा वाहतूक गाड्या चांगल्या कंडिशन असाव्यात जेणेकरून कंत्राटी वाहन चालकास  व रस्त्यावरून चालणाऱ्या जनतेला धोका पोहोचू नये याची पण काळजी पालिकेने घ्यावी असे मत त्यांनी मांडले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते तसेच मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड.अनिल केसरकर, रवी जाधव, प्रतीक बांदेकर, सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर, राजू कासकर, केतन सावंत , सामाजिक कार्यकर्ते महेश पांचाळ, माहिती अधिकारी सुशील चौगुले तसेच कंत्राटी कर्मचारी प्रमुख बाबू बरागडे, विनोद काष्टे, राजू मयेकर, सागर खोरागडे, सोहेब शेख उपस्थित उपस्थित होते.