कुठे आहेत किरण सामंत..?

मंत्री दीपक केसरकर यांनी दिली माहिती
Edited by: विनायक गांवस
Published on: May 07, 2024 11:25 AM
views 716  views

सावंतवाडी : रत्नागिरीचा विषय रत्नागिरीपूरता मर्यादित आहे‌. उबाठाने अफवा उठवायचा कितीही प्रयत्न केला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यावर त्याचा कोणताही फार मोठा परिणाम होणार नाही. किरण सामंत हे दिलदार कार्यकर्ते आहेत. महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचेच ते काम करत आहेत. याची खात्री मी देतो अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तर किरण सामंत नॉटरिचेबल नसून त्यांचा मोबाईल नॉटरिचेबल आहेत‌. ग्रामीण भागात ते आहेत. उलट मोबाईल नॉटरिचेबल असण्याला अपयशी ठरलेले खासदार विनायक राऊतच आहेत असा पलटवार मंत्री केसरकर यांनी लागावला. 

ते म्हणाले, किरण सामंत नॉटरिचेबल असू शकत नाहीत, त्यांचा मोबाईल असू शकतो.  ‌ग्रामीण डोंगरी भागात रेंज मिळत नसल्यानं मोबाईल नॉटरिचेबल असतो. त्यामुळे यावरून फार मोठा गैरसमज करू नये. उबाठान देखील यावर जास्त खूष होऊ नये. किरण सामंत यांनी पुरेसा प्रचार केलेला आहे‌. अफवांना उत देण्याच काम वैभव नाईक, विनायक राऊत करत आहेत. जनता त्यांच्याकडे दुर्लक्ष करेल असं मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. दहा वर्षांत पॉवरफुल्ल खासदार असता तर कोकणात सगळीकडे रेंज मिळाली असती. खासदार विनायक राऊत यासाठी अपयशी ठरलेत. त्यामुळे सामंताचा फोन नॉटरिचेबल आहे. तर विनायक राऊत हे दुबळे असताना ते दुसऱ्याला कणखर म्हणत आहेत त्यासाठी त्यांच कौतुक करतो. त्यांनी किरण सामंत यांची काळजी करू नये. खोटी आशा सामंतांकडून ठेऊ नये. किरण सामंत यांना आता उमेदवारी मिळाली नसली तरी ते आमदार, एमएलसी होतील. त्यांच्यासाठी सर्व दरवाजे खुले आहेत. ते एक  सक्षम नेतृत्व आहेत. बुथला भेटी देत असल्यामुळे फोन लागत नसेल. आल्यावर किरण सामंतच यावर उत्तर देतील असं केसरकरांनी सांगितले. तर ही अफवा उबाठानं उठवलेली अफवा आहे. नारायण राणेंना  मिळणारा प्रतिसाद पाहून उबाठा अशा गोष्टी करत आहेत. अफवा उठवण्यासाठी उबाठा एक्स्पर्ट आहेत असा टोला केसरकर यांनी हाणला.

वैभव नाईक शिर्डीला चला‌..!

दरम्यान, आ.वैभव नाईक आजकाल खुपचं सणसणाटी बोलायला लागले आहेत. त्यामुळे त्यांची काळजी वाटू लागली आहे. किरण सामंतांनी सणसणीत उत्तर दिलं तर वैभव नाईकांच काय होईल ? त्यामुळे नाईकांनी सध्या शांत रहाव‌ं. मी आज शिर्डीला जात आहे‌. पन्नास खोके घेतले असं ते म्हणत असतील तर त्यांनी माझ्यासोबत शिर्डीला यावं, साईबाबांच्या समक्ष त्यांना सांगतो असं विधान केलं.