चिपळूण हायटेक बसस्थानक बांधकामाचे ग्रहण कधी सुटणार ?

Edited by: मनोज पवार
Published on: October 19, 2024 08:34 AM
views 190  views

चिपळूण  : 'हायटेक'च्या धर्तीवर बांधण्यात येत असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकाचे बांधकाम कित्येक वर्षानंतर पहिल्या मजल्याच्या स्लॅबचे बांधकाम पूर्ण झाले आहे. असे असताना इतके दिवस होवूनही उर्वरित बांधकाम रखडलेल्या स्थितीत आहे. याशिवाय दुर्लक्षा अभावी बांधकामा ठिकाणी झाडीझुडपांनी वेढा घातला असून मोकाट श्वानासह जनावरानांही रखडलेल्या बसस्थानकाची इमारत आश्रयस्थान बनले आहे. या बाबत प्रवाशांतून तीव्र संताप व्यक्त होत असून रखडलेल्या बसस्थानकाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात  असून हायटेक बस स्थानकाच्या साडेसातीचे ग्रहण कधी सुटणार असाच प्रश्न सर्वांना पडला आहे.

जीर्ण असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकानकाची इमारत तोडून त्या जागी नव्याने सोयी सुविधांयुक्त हायटेकच्या धर्तीवर बसस्थानक बांधण्यास काही वर्षापूर्वी प्रारंभ झाला. काही दिवस जाता त्यावेळचा ठेकेदार व एसटी महामंडळ याच्या कुचकामी भूमिकेमुळे या बसस्थानकाच्या  बांधकामाचा सुरुवातीपासून बट्ट्याबोळ उडाला. परिणामी कित्येक वर्ष होऊनही बसस्थानकाचे बांधकाम रखडलेल्या स्थितीत होते. असे असताना हे बसस्थानक पूर्णत्वास जावे, यासाठी राजकीय पक्षाच्या स्थानिक नेतेमंडळींनी आगार प्रशासनावर निवेदनाचा वर्षाव सुरु केला होता. यातूनच महामंडळास जाग आल्यानंतर रखडलेले बसस्थानकाचे बांधकास सुरु करण्यासाठी पूर्वीच्या ठेकेदाराचा ठेका काढून  त्या जागी नव्या ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली, या ठेकेदाराने रखडलेल्या बांधकामासाठी गती घेतल्यानंतर कित्येक वर्षानंतर

इमारतीचा पाया पूर्णत्वास गेला. इमारतीचे पिलर उभारल्यानंतर पहिल्या मजल्याचा स्लॅबचे कामही पूर्ण झाले आहे. एकूणच हे काम लक्षात घेता बसस्थानकाचे काम पूर्णत्वास जाईल, अशीच अपेक्षा प्रवाशांनीही वर्तवली होती.

मात्र,  पहिल्या स्लॅबच्या कामानंतर कित्येक दिवस होवून उर्वरित बांधकाम रखडले आहे. बांधकामा ठिकाणी कामगारही दिसेनासे झाले आहेत. इतकेच नव्हे दुर्लक्षा अभावी बांधकामाला झाडीझुडपाने वेढा घातला आहे. याशिवाय मोकाट श्वानासह जनावरानांही रखडलेल्या बसस्थानकाच्या इमारतीत आसरा होत घेत असून अनेकांनी ऊन, पावसापासून दुचाकीचे संरक्षण व्हावे, यासाठी त्या ठिकाणी पार्किंग सुरु केले आहे. या अर्धवट बांधकामाविषयी प्रवांशातून तीव्र संताप व्यक्त होत असून बसस्थानक बांधकामाला कधी गती मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.