रूग्णांची परवड थांबणार कधी ?

युवा रक्तदाता संघटनेचा सवाल
Edited by: विनायक गांवस
Published on: December 05, 2022 17:32 PM
views 238  views

सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात ७० टक्के रूग्ण हे ग्रामीण भागातून येतात. मात्र, या गोरगरीब रूग्णांना मोफत उपचार, औषधासाठी तासंतास बसून रहावे लागते आहे. रिक्त असणारी महत्त्वाची पद आणि वाढलेला कारभार यामुळे डॉक्टरांची कसरत होत आहे. सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून आलेल्या पेशंटवर उपचार करण्यासाठी ओपीडीत डॉक्टर उपलब्ध नव्हते. ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर असल्यानं व काही डॉक्टर सुट्टीवर असल्यानं उपचार करण्यासाठी उशीर झाल्याचे यावेळी उपस्थित डॉक्टरांकडून सांगितल गेल. उपचार होत नसल्यानं वेदानान एका महिलेन हंबरडा फोडल्यानंतर डॉक्टरांची धावाधाव सुरू झाली. यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी घटनास्थळी जात या परिस्थितीची माहिती प्र. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांना दिली. ओपीडीत सकाळपासून येऊन देखील उपचार मिळाले नाहीत. तर सरकारी औषधालय १२.३० ला बंद झाल्यानं सायं. ४ वाजेपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे अशी व्यथा रूग्णांनी सुर्याजींकडे मांडली‌. जिल्हा शल्य चिकित्सकांना माहिती दिल्यानंतर ताबडतोब डॉक्टर व औषध अधिकारी यांनी उपस्थित राहत रूग्णांच निदान करत सेवा दिली. 


सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात १०४ मंजूर पदांपैकी केवळ ७२ पद भरलेली आहेत. ३२ पद ही रिक्त आहेत. यात वैद्यकीय अधिक्षकांसह पूर्ण वेळ फिजीशीअनचा अभाव आहे. एकाच व्यक्तीवर अधिकचे पदभार आहेत. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना रूग्ण सेवा करणं मुश्किल झाले आहे. याची आरोग्य प्रशासनानं व राज्य सरकारनं गंभीरपणे दखल घेत तातडीनं पद भरावीत, तर ग्रामीण भागातून येणाऱ्या रूग्णांकरीता सरकारी औषधालय हे दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवाव अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी यावेळी केली.


दरम्यान, अस्थिरोग तज्ञ गैरहजर असल्यानं येथील डॉक्टरांनी खाजगी डॉक्टरांकडे उपचार घेण्यास सांगितल्याच एका रूग्णाकडून सांगण्यात आल. याबाबत डॉक्टरांना विचारणा केली असता, असं आपल्याकडून सांगितल गेलेल नाही. अस्थिरोग तज्ञ गैरहजर आहेत. तर रूग्णांवर लवकर उपचार होण गरजेच आहे. त्यामुळे त्यांना जिल्हा रूग्णालयात जाण्याचा सल्ला दिल्याच डॉक्टरांकडून सांगितल गेल. या प्रकारामुळे आरोग्य क्षेत्रात रूग्णांची होणारी परवड पुन्हा एकदा समोर आली असून रूग्णांना चांगले उपचार व चांगल्या सुविधा सरकारी रूग्णालयात कधी मिळणार हाच सवाल पुन्हा एकदा उपस्थित होत आहे.