
कणकवली : देवगडमधील मटका दारू धंदे बंद करा, अन्यथा 15 नोव्हेंबरला मोर्चा काढू, या अल्टिमेटमनंतर देवगड पोलीस स्टेशन ॲक्शन मोडमध्ये येत देवगड पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांनी कारवाईस सुरुवात केली, पण कणकवली वागदे येथे सोशल क्लबच्या नावाखाली सुरू असलेला जुगार तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू, मटका, ऑनलाइन झटपट लॉटरी, गुटखा, गांजा, वेश्याव्यवसाय हे देखील जोमाने सुरू असल्याने त्यावर कारवाई कधी होणार, असा सवाल आता उपस्थित होत आहे. त्यासाठी कुठल्या राजकीय पक्षांनी मोर्चा काढण्याची वाट कणकवली पोलीस बघत आहेत का, असा सवाल देखील सुजाण नागरिक विचारत आहेत.
मागील महिन्यात बहुतेक राजकीय पक्षांनी कणकवलीतील अवैध धंदे बंद करावे, यासाठी पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांना निवेदन देण्यात आले, पण अजून देखील कणकवली तालुक्यातील फोंडाघाट, खारेपाटण कासडे, कणकवली शहर व अन्य ठिकाणीही या अवैद्य जुगार, दारू वाहतूक, तसेच मोठ्या प्रमाणात मटका देखील सुरू आहे. भावी युवा पिढी या व्यसनाच्या आहारी जाऊन बरबाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कणकवली पोलिसांनी ठोस पाऊल उचलून हे अवैध धंदे आता बंद करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.