आमची सत्ता येईल तेव्हा हिशेब चुकता करू : आ. वैभव नाईक

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 13, 2023 10:58 AM
views 694  views

देवगड : काही दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ दे चर्चा कार्यक्रम सुरू आहे. मात्र, या कार्यक्रमाच्या आयोजनावरून विरोधकांच्या नाकाला मिरच्या झोंबत आहेत. भाजप सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत त्यामुळे लोकांकडून भाजप विरोधी प्रतिक्रिया उमटत आहेत. हा विरोध ते पचवू शकत नाहीत त्यामुळे चर्चेच्या मुद्द्यावरून ते हाणामारीवर येत आहेत. त्यालाही आमचे कार्यकर्ते जशास तसे उत्तर देत आहेत.भाजपने आमचा पक्ष फोडला, आमदार पळवले मात्र पक्षाचे कार्यकर्ते आणि जनता ही उद्धवजी ठाकरे आणि शिवसेनेसोबत कायम आहे हे आजच्या उपस्थितीवरून दिसून येते.

युवासेनेच्या गणेश गावकर याने तुम्हाला प्रश्न विचारला म्हणून तुम्ही त्याचा हात धरता. मात्र शिवसेनेचा करारी बाणा त्याने तुम्हाला दाखवून दिला. हा प्रकार घडत असताना इथले पोलीस निरीक्षक बगळे हे बघ्याच्या भूमिकेत होते. आज तुमच्याकडे सत्ता आहे ताकद आहे.परंतु त्यांना एकच सांगतो, सत्ता आज आहे तर उद्या नाही हे लक्षात ठेवा. आमची सत्ता येईल तेव्हा याचा हिशेब चुकता केला जाईल असा इशारा कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी देवगड येथे दिला.

“होऊ दे चर्चा विचारा प्रश्न!” अभियानानिमित्त देवगड कॉलेज रोडवरील कॉलेज नाका” येथे आज कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली.यावेळी आ.वैभव नाईक बोलत होते. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हा प्रमुख नीलम पालव, माजी तालुकाप्रमुख अँड प्रसाद करंदीकर,देवगड तालुकाप्रमुख जयेश नर,उपतालुका प्रमुख बुवा तारी,रवींद्र जोगल, युवासेना उपजिल्हा प्रमुख निनाद देशपांडे, युवासेना तालुकाप्रमुख गणेश गांवकर,महिला संघटक हर्षा ठाकूर,सायली घाडी, फरीद काझी, सुनील तेली, दत्ताराम तिर्लोटकर शहर प्रमुख संतोष तारी, वर्षा पवार,आरोही चिंदरकर,राजीव वाळके,सुनील जाधव, प्रमोद वळंजू, सुनील तेली,शिवसेना,युवासेना,महिला आघाडीचे पदाधिकारी व सरपंच, ग्रा. प. सदस्य, नगरसेवक, आजी माजी लोकप्रतिनिधी यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संदेश पारकर म्हणाले, केंद्र व राज्य सरकारने जनतेला त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित ठेवले आहे.देवगडात राणे भाजपचा १० वर्षे आमदार आहे. मात्र इथले मूलभूत प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत.त्यामुळे शिवसैनिक पेटून उठला आहे.प्रश्न विचारून त्याचा जाब विचारत आहेत.त्याचा राग नितेश राणेंच्या मनात आहे.त्यामुळे गुंडगिरी करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. मात्र या गुंडगिरीला चोख प्रत्युत्तर येणाऱ्या काळात शिवसेना आणि जनता देणार आहे. देवगड सुसंस्कृत आणि शांतताप्रिय आहे. मात्र आता याठिकाणी राडा संस्कृती निर्माण केली जात आहे असे संदेश पारकर यांनी सांगितले.

सतीश सावंत म्हणाले, देवगड नगरपंचायतीत विजय झाला तेव्हा माजी आमदार अजित गोगटे यांच्या कार्यालयावर आ.नितेश राणेंनी अंडी फेकली होती.मात्र ते आता सोयीस्कररित्या विसरले आहेत. मात्र गणेश गावकर याने जे धाडस दाखवले त्या धाडसामुळे इथल्या जनतेच्या प्रश्नांना वाचा फुटली.गणेशच्या आंदोलनातुन ते सर्व प्रश्न नक्कीच सुटतील. भाजपने देवगड मधील प्रश्न,समस्यांचे लावलेले बॅनर जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. गेली ३० वर्षे राणे आणि भाजप देवगडचे सत्ताधारी आहेत. मग एवढ्या कालावधीत हे प्रश्न त्यांनी का सोडविले नाहीत.हे येथील आमदाराचे अपयश आहे.आणि आपल्याच अपयशाचे बॅनर भाजपने देवगड मध्ये लावले आहेत. असा घणाघात सतीश सावंत यांनी करत देवगड येथील वॅक्स म्युझियमचे काय झाले? त्याचे भाडे थकविण्यात आले आहे अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी सुशांत नाईक,नीलम पालव,ऍड.प्रसाद करंदीकर,जयेश नर, गणेश गावकर यांनी देवगड मधील प्रश्न समस्यांचा पाढा वाचत केंद्र आणि राज्यातील सरकारवर जोरावर टीका केली.महागाईची तसेच भाजपच्या माध्यमातून सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडली.बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड केला असही ते म्हणाले.