
सावंतवाडी : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हाधिकारी, सीईओंच्या उपस्थित सावंतवाडी नगरपरिषदेच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. यावेळी घडलेल्या एका प्रसंगानं सारेच जण चकीत झाले. सभागृहाच्या दारापाशी उभ्या असलेल्या न.प.शिपायाला मंत्री दीपक केसरकर यांनी नावानीशी हाक मारत आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पाहुणचार तुम्ही करू शकता, असं सांगितलं. शिक्षणमंत्र्यांनी शिपायाला नावानीशी मारलेली हाक ऐकून उपस्थित देखील काही काळ चकीत झाले.
गोपाळ भास्कर सावंत हे गेली 31 वर्ष शिपाई म्हणून नगरपरिषदेत सेवा बजावत आहेत. 1996 ते 2006 या दीपक केसरकर यांच्या नगराध्यक्ष पदाच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात शिपाई म्हणून काम पाहिले होत. आज राज्याचे मंत्री झाल्यानंतरही दीपक केसरकर यांनी शिपायाला नावानीशी हाक मारल्यान उपस्थित भारावून गेले.
दरम्यान, माझ्यासह न.प. च्या अधिकारी, कर्मचारी यांना शिक्षणमंत्री दीपक केसरकर नावानीशी हाक मारतात. इतक्या वर्षांच्या नंतरही ते नावं विसरले नाहीत. त्यांनी भर सभागृहात बड्या अधिकाऱ्यांसमोर नावानीशी हाक मारल्यानंतर उर अभिमानाने भरून आला अशा भावना गोपाळ उर्फ आकाश सावंत यांनी व्यक्त केल्या.