रेल्वे टर्मिनस बाबत केसरकरांची भूमिका काय..?

सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलनचा इशारा
Edited by:
Published on: December 24, 2023 18:37 PM
views 54  views

सावंतवाडी : तब्बल १५ वर्षे सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणार्‍या आमदार दीपक केसरकर यांनी रेल्वे टर्मिनस प्रश्नी आपली भूमिका जाहीर करावी. हा प्रश्न त्यांच्याच मतदार संघातील आहे. त्यामुळे आमच्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आज येथे झालेल्या कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या बैठकीत करण्यात आले. दरम्यान या प्रश्नी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सकारात्मक आहेत. त्यामुळे त्यांच्यासह अन्य नेत्यांची भेट घेवून पुढील भूमिका ठरविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला तसेच याबाबत योग्य तो सकारात्मक निर्णय न झाल्यास २६ जानेवारीला आंदोलन करू, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. संदिप निंबाळकर यांनी दिला.

कोकण रेल्वे आणि सावंतवाडी टर्मिनस बाबत पुढील भूमिका घेण्यासाठी आज येथील श्रीराम वाचन मंदिरात प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक झाली. यावेळी या सर्व गोष्टी मंजूर होण्यासाठी स्थानिक आमदार म्हणून मंत्री केसरकर यांचा पाठिंबा गरजेचा आहे. त्यामुळे त्यांची याबाबत नेमकी भूमिका काय? हे त्यांनी जाहीर करावे. एवढ्यावरच न थांबता प्रवासी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनात त्यांनी सहभागी व्हावे. मंत्र्यांना भेटण्यासाठी, पाठपुरावा करण्यासाठी आवश्यक असलेले सहकार्य करावे, असे आवाहन पदाधिकार्‍यांनी यावेळी केले.

मडुरा ऐवजी मळगाव येथे टर्मिनस उभारण्यास केद्रींय मंत्री राणे हे सकारात्मक आहेत तसे त्यांनी कणकवली येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. त्यामुळे हा लढा यशस्वी होण्यासाठी राणेंचे सहकार्य घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्याच बरोबर खासदार विनायक राऊत, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, माजी खासदार निलेश राणे, आमदार वैभव नाईक, नितेश राणे यांना ही प्रवाहात सहभागी करुन कोकण रेल्वेचे जास्तीत-जास्त प्रश्न सुटण्याबरोबर प्रवाशांना चांगल्या सुविधा कशा मिळतील तसेच जास्तीत-जास्त गाड्या कशा थांबतील याबाबत पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच बरोबर याबाबत रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केल्यानंतर सकारात्मक निर्णय होतील, अशी अपेक्षा आहे. अन्यथा २६ जानेवारीला आपण आंदोलन करू, असा इशारा यावेळी उपस्थित सर्व पदाधिकार्‍यांकडून देण्यात आला.

यावेळी ॲड.संदीप निंबाळकर, सचिव मिहीर मठकर, सागर तळवणेकर, नंदन वेंगुर्लेकर, रवींद्र ओगले, सुभाष शिरसाट, जगदीश मांजरेकर, अँड. नकुल पार्सेकर, अमोल टेंबकर, तेजस पोयेकर, पुंडलिक दळवी, सागर नाणोसकर, सिद्धेश सावंत, नितेश देसाई आदी उपस्थित होते.