
मालवण : विनायक राऊत खासदार आणि वैभव नाईक आमदार असताना दहा वर्षात किनारपट्टीवरील एकाही मच्छिमाराला कोणतीही नोटीस आली नाही. मग आताच या नोटीसा का आल्या ? यामगच गूढ काय ? असा सवाल करत याविरोधात प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारा ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी शिवसेना शाखा येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी उमेश मांजरेकर, बाबी जोगी, मंदार ओरसकर, स्वप्निल आचरेकर, निनाक्षी शिंदे, सिद्धेश मांजरेकर, गौरव वेर्लेकर, हेमंत मोंडकर, प्रसाद चव्हाण, चिंतामणी मयेकर, महादेव कोळंबकर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना खोबरेकर म्हणाले, विनायक राऊत खासदार आणि वैभव नाईक आमदार असताना किनारपट्टीवरील प्रश्नांसाठी ते कार्यरत होते. एलइडी मासेमारी, अनधिकृत पर्ससीन मासेमारी आणि पारंपारीक मच्छिमारांच्या न्याय हक्कासाठी ते वाचा फोडत होते. परंतु आज दहा वर्षाचा कालखंड संपल्यानंतर आता मच्छिमारांना नोटीसा येऊ लागल्या आहेत. मागील दहा वर्षात कुठचीच नोटीस आली नव्हती. आताच या नोटीसा का येतात ? यामगचे गूढ काय आहे ? किनारपट्टीवरील लोकं आपल्याकडे खेचण्यासाठी अशा नोटीसा काढल्या का ? असा आम्हाला संशय आहे. एलइडी मासेमारी सध्याचे आमदार, पालकमंत्री, खासदार थांबवू शकत नाहीत. आता मासेमारी हंगाम सुरु होणार आहे. एकही अअतयाधुनिक गस्ती नौका ते आणू शकले नाही. उलट मच्छिमारांना नोटीसा देण्याचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे या विरोधात माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली प्रसंगी न्यायालयात जाऊ असा इशारा खोबरेकर यांनी दिला.