
दोडामार्ग : बिक्कोडो, ता. बेलूर, जि. हसन, राज्य कर्नाटक, या गावातील मागील दोन महिन्यात चार माणसे रानटी हत्तींच्या हल्ल्याने दगावली आहेत. या भागात सध्या जवळपास ८० हत्तींचा वावर आहे. ज्या हत्तींमुळे माणसे दगावली आहेत त्याच हत्तींना पकडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे सध्या बिक्कोडो या गावात माणसांना साठी धोकादायक बनलेल्या हत्तींना पकडण्याचे काम सुरू असल्याची माहिती हसन जिल्ह्याचे उपवनसंरक्षक सौरभ कुमार यांनी दिली.
दोडामार्ग तालुक्यातील वनविभागाचे अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व पत्रकार यांची टीम कर्नाटक राज्यातील बिक्कोडो ( ता. बेलूर, जि. हसन ) या गावात अभ्यास दौऱ्यासाठी दाखल झाली आहे. कर्नाटक वनविभाग कशाप्रकारे हत्ती पकड मोहीम राबवितात याबाबतची इत्यंभूत माहिती घेण्यात आली आहे. यावेळी सहाय्यक उपवनसंरक्षक वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल वैशाली मंडळ, वनपाल किशोर जंगले, वनरक्षक अजित कोळेकर, सुशांत कांबळे, स्वराज्य सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, मोर्ले सरपंच संजना धुमास्कर, पाटये पुनर्वसन सरपंच प्रवीण पांडुरंग गवस, हेवाळे उपसरपंच समीर देसाई, ग्रा. पं. सदस्य यशवंत देसाई, तुकाराम दळवी, भाग्यश्री चारी, रवींद्र देसाई, सुमित गवस, लॉरेन्स डिसोझा, पत्रकार समीर ठाकूर, यांसह प्रमोद गवस, आप्पा राणे आदी सहभागी झालेत.
आम्हालाही दऱ्या, खोऱ्यांचा सामना करावा लागतो : सौरभ कुमार
कर्नाटक राज्यात सरपंच सेवा संघाचे प्रवीण गवस यांच्या नेतृत्वाखाली अभ्यास दौऱ्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाने उपवनसंरक्षक यांना सांगितले की, आमच्याकडे मोठ्या प्रमाणात दऱ्या – खोऱ्या, तसेच मोठ्या प्रमाणात जंगल भाग आहे. या ठिकाणी ज्याप्रमाणे हत्ती पकड मोहीम राबवित आहात त्याप्रमाण आमच्या भागात राबवू शकतो का असे विचारले. त्यावेळी सौरभ कुमार म्हणाले की, आमच्या या हसन जिल्ह्यात देखील दऱ्या खोऱ्या आहेत. त्याशिवाय कॉफीची मोठ्या प्रमाणात या भागात शेती केली जाते. या कॉफीच्या शेतीत जर एखादा हत्ती असेल तर तो जोपर्यंत समोर येत नाही तोवर दिसतच नाही. तरी असताना आम्ही हत्ती पकड मोहीम मोठ्या जिकरीने राबवितो.
सर्वच हत्तींना आम्ही पकडू शकत नाही
यावेळी माहिती देताना सौरभ कुमार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही हत्तींना पकडू शकत नाही. मात्र ज्या हत्तीमुळे जीवितहानी झाली आहे, अशाच हत्तींना पकडण्यासाठी शासन तथा आमचे वरिष्ठ अधिकारी आम्हाला हत्ती पकडण्याची कार्यवाही करा असा आदेश देतात. त्यानंतर ही पकड मोहीम राबविली जाते असेही ते म्हणालेत.
हत्ती पकड मोहीमसाठी ७ शिकावू हत्तींचा वापर
सध्या बिक्कोडो या गावात हत्ती पकड मोहीम राबविण्यासाठी वनविभागाचे सात शिकावू हत्ती वनविभागाच्या खांद्याला खांदा लाऊन काम करताना अभ्यास दौऱ्यावेळी दिसून आले. याशिवाय ज्या भागात हत्तीचा वावर आहे अशा ठिकाणी वनविभागाचे म्हणजेच इएनटी अर्थात एलिफंट टास्क फोर्स आपला तंबू लाऊन डेरा टाकून २४ तास राहतात. तसेच २० अधिकारी व १८० इतर वनविभागाचे कर्मचारी व अन्य कॉन्ट्रॅक्ट बेसवर कर्मचारी हत्ती पकड मोहिमेत आहेत. या सर्वांच्या मदतीने हत्तींना पकडण्यात येत आहे असेही सौरभ कुमार यांनी स्पष्ट केले.
अशाप्रकारे कर्नाटकात हत्ती पकडला जातोय
जो हत्ती अती त्रासदायक आहे. त्या हत्तीला आधी वनविभागाकडून टार्गेट बनवलं जाते. त्यानंतर तो हत्ती मादी आहे की नर आहे हे तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासले जाते. त्यानंतर हत्तींचे वजन किती आहे, त्याची सध्याची प्रकृती कशी आहे याबाबत चाचपणी केली जाते. त्यानंतरच त्याला गुंगीचे औषध देण्यात येते. गुंगीचे औषध दिल्यानंतर हत्ती जवळपास २० मिनिटानंतर बेशुद्ध होतो. बेशुद्ध झालेल्या हत्तीला दोरखंडाने चार ते पाच वनविभाच्या शिकाऊ हत्तीनेच बांधले जाते. त्यानंतर त्याला खास बनविलेल्या गाडीत घालून नैसर्गिक अधिवासात सोडले जाते.
३०० किलोमीटर एक हत्ती परत आला
एका हत्तीला दोन वर्षांपूर्वी पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात जवळपास ३०० किलोमीटरच्या अंतरावर सोडले होते. मात्र तो हत्ती परत या ठिकाणी आल्याने परत आमची डोकेदुखी वाढली असल्याचेही त्यांनी बोलताना सांगितले.