काय घडलं सावंतवाडीच्या लोकार्पण सोहळ्यात?

Edited by:
Published on: August 09, 2024 14:50 PM
views 306  views

सावंतवाडी : दोन महिन्यांनी होणाऱ्या निवडणुकींसाठी सावंतवाडीच्या व्यासपीठावरील अनेक जण इच्छुक आहेत. माझ्या त्यांना शुभेच्छा.लोकांमध्ये जाऊन काम करा, वातावरण निर्मीती करा, निवडणूक आहे असं वाटलं पाहिजे.लोकहीतासाठी कार्य करा, वैयक्तिक स्वार्थासाठी नको. तर रविंद्र चव्हाण यांनी वजनकाटा आणला आहे. ते वजनकाट्यावरून 12 पैकी एक निवडतील अशी मिश्किल टीपणी खासदार राणेंनी केली. सावंतवाडी येथील रेल्वे स्थानके सुशोभीकरण लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. 

खा. राणे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाच नेतृत्व करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्ग व सावंतवाडीच्या स्थानकांच्या लोकार्पणाच्या माध्यमातून रविंद्र चव्हाण यांनी देखील हॅट्रिक केली. जिल्ह्याचा विकास गतिमान दिशेने जात आहे. रेल्वे स्थानकाकडे आल्यावर आनंद होतो, प्रसन्न वाटत. राज्य सरकार, मंत्री रविंद्र चव्हाण, बांधकाम विभाग व कोकण रेल्वेच यासाठी अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. योग्य प्रकारे विकास साधला तर हा जिल्हा देशातील विकसित जिल्हा झाल्याशिवाय राहणार नाही. शेजारील गोवा राज्याची आर्थिक उलाढाल ही पर्यटनाच्या माध्यमातून आहे. तेच वातावरण सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाल्यास आपलं दरडोई उत्पन्न वाढणार आहे. पर्यटनातून प्रगती साध्य करता येणार आहे. औद्योगिक क्रांतीला देखील आज महत्व आले आहे. माझा जिल्हा कसा प्रगत होणार याचा विचार सर्वांनी करणं आवश्यक आहे. आपल्या जिल्ह्यात सर्वकाही आहे. अंतर्गत स्पर्धेशिवाय बाहेरील उद्योजकांसोबत स्पर्धा करा. आंबा, काजू, फणसाला जगात मागणी आहे. त्यातून उत्पादित होणाऱ्या पदार्थालाही मोठी मागणी आहे. मात्र, त्यासाठीचे कष्ट आपण घेत नाही, ते घेणं आवश्यक आहे. आपण पहात राहतो, बाजारात येत ते खात राहातो, बनवत नाही. त्यामुळे ते बनवणं आवश्यक आहे. व्यवसाय केल्यास मोठं उत्पन्न प्राप्त होईल असं मत राणेंनी व्यक्त केल. तसेच रविंद्र चव्हाण यांनी अभिमान वाटाव असं रेल्वे स्थानकाच सुशोभीकरण केलं आहे. याचा फायदा लोकांनी घ्यावा, दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावा. कोकणी माणूस हुशार आहे. मुंबई सारख उत्पन्न आपलं व्हाव यासाठी कोकणी माणसाने प्रयत्न करावेत. आम्ही प्रगती करत राहू. मात्र, व्यवसायाशी स्पर्धा आपल्याला करायची आहे‌. आजचा सामारंभ बोध घेण्यासाठी आहे. 

मनोगतात मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले, गेली अनेक वर्षे ज्याची प्रतिक्षा होती असे विषय मार्गस्थ होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांसाठी आम्ही कार्यरत आहोत. हे सरकार सर्वसामान्यांच आहे हे कृतीतून आम्ही सिद्ध केलं आहे‌. माझ्या मंत्रीपदाचा उपयोग सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी केला. संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत निधी उभारला. महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी 92 हजार कोटींच्या कामाला मंजुरी व कामाला सुरुवात केली. साडेपाच कोटी रुपये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी दिले. कोकण रेल्वेने  दिलेल्या परवानगीमुळे त्याचा बाह्य भाग बदलू शकलो‌. कोकणातील 12 रेल्वे स्थानकांच रूपडं पालटण्यात आलं. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केल्यानंतर नारायण राणे यांनी गोव्याशी कशी स्पर्धा करता येईल याचा विचार केला. पर्यटन दृष्ट्या गोवा सदन होऊ शकतो तर सिंधुदुर्ग ही होऊ शकतो. इथल स्थलांतर थांबविण्यासाठी सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण आवश्यक आहे असं मत श्री. चव्हाण यांनी व्यक्त केले.सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छतेसाठी महाराष्ट्रातील एक नंबर आहे. पर्यटनाला हवा असलेला गुण आपल्याकडे आहे. यात आणखीन सुधारणा करणं आवश्यक आहे. लोकप्रतिनिधी व गावातील सरपंच यांनी स्मार्ट व्हिलेज ही पंतप्रधानांची संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्न करावेत. आपलं गाव वेगळ्या पद्धतीने जगात कसं पोहचेल यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. आजच्या युगात ग्लोबल असण आवश्यक आहे असं मत त्यांनी व्यक्त केले.

तसेच उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. नारायण राणे यांच्यानंतर रविंद्र चव्हाण यांनी सर्वाधिक निधी सिंधुदुर्ग जिल्ह्याला आणण्याच काम केलं. महाराष्ट्राची सुरूवात ज्या सावंतवाडीपासून होते. मात्र, या ठिकाणी कोरोनात अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या बंद करण्यात आल्या होत्या‌. या पूर्वीप्रमाणे सुरू कराव्यात अशी मागणी माजी आमदार राजन तेली यांनी केली. तसेच अंतर्गत रूप देखील केंद्राच्या माध्यमातून पालटाव असं म्हणाले. शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी म्हणाले, सर्वांना अभिमान वाटावा असं सुशोभीकरण करण्यात आलं आहे. पालकमंत्री रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर या त्रिमूर्तींच्या प्रयत्नान विकास सुरू आहे. तर कोकण रेल्वेचे आर.के. हेगडे म्हणाले, कोकण रेल्वेसाठी प्रा. मधु दंडवते यांनी मेहनत घेतली होती. कोकण पट्ट्यात रेल्वे चालवण सोपं नाही. पावसासह 365 दिवस आम्ही सेवा देत आहोत. आज रेल्वे स्थानकामध्ये येताना मला विमानतळावर आल्यासारख वाटलं. लोकांना चांगली सुविधा या निमित्ताने मिळणार आहे‌‌. यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांचे धन्यवाद देतो अशा भावना व्यक्त केल्या.

सावंतवाडीच हे टर्मिनस आधुनिक असेल : दीपक केसरकर

दृकश्राव्य प्रणालीद्वारे उपस्थित राहत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शुभेच्छा दिल्या. सावंतवाडी रेल्वे स्टेशनच सुशोभीकरण करण्यात आलं आहे‌‌. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून कोकणातील रेल्वे स्थानकांच रूपडं पालटण्यात आलं आहे. याचा फायदा पर्यटनाला होणार आहे‌‌. सावंतवाडी टर्मिनसच्या माध्यमातून या ठिकाणी चांगल्या पर्यटन सुविधा देखील उपलब्ध होणार आहेत. पर्यटन जिल्ह्यात हा प्रकल्प होत आहे‌. सावंतवाडीच हे टर्मिनस आधुनिक असं असेल असं मत दीपक केसरकर यांनी व्यक्त करत  शुभेच्छा दिल्या.

रेल्वे टर्मिनसचा लवकर पूर्ण करेन : नारायण राणे

तसेच सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा विषय रेल्वे मंत्र्यासह बोलेन व तो विषय लवकर पूर्ण करेन. केंद्रीय रेल्वेमंत्री जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी देखील लक्ष वेधेन असं मत माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केले. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री व मुख्यमंत्री यांनी भुमिपूजन करूनही टर्मिनसच्या रखडलेल्या विषयाबाबत विचारल असता खास.राणे बोलत होते.

'मी' बारांमध्ये नाहीवो ; राणे-तेलींमध्ये हलकाफुलका संवाद

या सोहळ्यातून निघताना 

माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे व माजी आमदार राजन तेली यांच्या हलकाफुलका संवाद झाला. यावेळी १२ जणांना माझ्या शुभेच्छा असा शुभसंदेश नारायण राणेंकडून तेलींना दिला असता मी १२ जणात नाहीवो असं तेली म्हणाले. स्थानकाबाहेर निघताना राणे-तेलींमध्ये हा हलकाफुलका संवाद पहायला मिळाला.