पदवीधर आमदार नेमकं करतात काय ?

विद्यार्थांचा सवाल ; परिक्षा तोंडावर, पुस्तकांचा नाही पत्ता !
Edited by: विनायक गांवस
Published on: April 05, 2025 13:42 PM
views 213  views

सावंतवाडी : पदवीधर विद्यार्थी वर्गाला यशवंतराव चव्हाण विद्यापीठाकडून एम.ए. शिक्षणक्रमाची पुस्तके न पुरवल्यानं पिळवणूक होत आहे. नवीन शैक्षणिक धोरणाचा अवलंब केल्यानंतर परिक्षा तोंडावर आली असताना देखील छापील स्वरूपातील पुस्तकं विद्यार्थ्यांना दिली गेली नाहीत. कोकण पदवीधर आमदार अँड. निरंजन डावखरे यांचंही लक्ष याकडे विद्यार्थी वर्गान वेधलं. मात्र, अद्यापही पुस्तक छापील स्वरूपात न मिळाल्यानं पदवीधर आमदार नेमकं करतात काय ? असा सवाल पदवीधर विद्यार्थी विचारत आहेत. 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या एम.ए.मराठी/ हिंदी/ अर्थशास्त्र /लोकप्रशासन/ इतिहास या शिक्षणक्रमाची चौथ्या सेमिस्टरची पुस्तके परिक्षा मे महिन्यात तोंडावर आली असताना अद्याप अभ्यासक्रम लेखी स्वरूपात तयार नाही. ऑनलाईन पद्धतीने पोर्टलवर ५० टक्के अभ्यासक्रम उपलब्ध आहे. अभ्यासक्रम बघता ऑनलाईन अभ्यास करणं शक्य नाही. त्यात कोकणातील नेटवर्कची परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांची नाहक पिळवणूक होत असून विद्यापीठ फी घेऊनही सेवा देत नाही. या विद्यापीठातून नोकरदार विद्यार्थी वर्ग शिक्षण घेत आहे. याचा विचार करता पुस्तक प्राप्त होणं, क्रमप्राप्त होत. तिसऱ्या सेमीस्टरची पुस्तके देखील परिक्षेच्या दोन दिवस आधी मिळाली. यंदाचे चौथ सेमिस्टर अंतिम असल्याने पुस्तकं लवकरात लवकर मिळण आवश्यक आहे. पुस्तकांअभावी विद्यार्थी वर्गाला शिक्षणाच्या हक्कापासून विद्यापीठ रोखत आहे. या परिस्थितीचा नाहक मनस्ताप अभ्यास केंद्राना होत आहे. याबाबत पदवीधर आमदार अँड. निरंजन डावखरे यांचे पदवीधर विद्यार्थ्यांनी लक्ष वेधून देखील त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यामुळे पदवीधर आमदार नेमकं करतात काय ? असा सवाल विचारला जात आहे. पदवीधरांचे आमदार म्हणून सत्तासुख घेणारे प्रतिनिधी आता पदवीधरांना न्याय देणार का हे पहावे लागणार आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांचा रोष विचारात घेऊन विद्यापीठाशी  संपर्क साधला असता नवीन शैक्षणिक धोरणाचा अभ्यासक्रम तयार होत आहे. झालेला अभ्यासक्रम पुस्तक स्वरूपात छापण्यात येत आहे. येत्या आठवड्यात भरात ती छापील पुस्तक अभ्यास केंद्रापर्यंत पोहोचतील. तर अद्याप तयार न झालेल्या अभ्यासक्रमाविषयी विद्यापीठाचे संचालक सांगू शकतील अशी माहिती देण्यात आली.