सावंतवाडी संस्थानकडून शिवरथ यात्रेचे स्वागत!

युवराज लखमराजे, युवराज्ञी श्रद्धाराजेंची शिववंदना
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: December 22, 2022 19:50 PM
views 229  views

सावंतवाडी : फुकेरी येथील हनुमंत गडावर रविवार २५ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्वांत मोठ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व तोफगाड्यांचे लोकार्पण होणार आहे. या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या रथयात्रेचे सावंतवाडी संस्थानकडून राजवाडा येथे स्वागत करण्यात आले. युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी यावेळी छत्रपतींच्या पुतळ्यास शिववंदन केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता.

सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग व श्री देवी माऊली सांस्कृतिक कला - क्रीडा मंडळ, फुकेरी यांच्या वतीने हनुमंत गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जिर्णोद्धार आणि तोफगाडा लोकार्पण सोहळा २५ डिसेंबर रोजी होणार आहे. याची जनमानसात जागृती व्हावी यासाठी दोडामार्गहून संपूर्ण जिल्हाभर रथयात्रा काढण्यात आली आहे. दोडामार्गहून ही यात्रा गुरुवारी   सावंतवाडीत दाखल झाली. यावेळी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले व श्रध्दाराजे भोंसले यांनी शिवरथाचे स्वागत केले. छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी राजेंना मानवंदना दिली. यानंतर सावंतवाडी शहरातून ही रॅली काढण्यात आली. यावेळी सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई, मातृभूमी शिक्षण संस्थ्येच्या अध्यक्षा डॉ. सोनल लेले, मराठा समाजाचे सावंतवाडी अध्यक्ष सीताराम गावडे, प्रा. सुभाष गोवेकर, ॲड. राहुल गायकवाड, सावंतवाडी मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.