WEATHER ALART | मुंबईकरांचे टेन्शन दूर! मोबाईलवर मिळणार हवामानाचे सर्व अपडेट्स

'बीएमसी'चा निर्णय
Edited by: प्रतिनिधी
Published on: May 17, 2023 11:14 AM
views 136  views

मुंबई : मुंबईतील पाऊस म्हटलं की नागरिकांना टेन्शन येते. कधी मुसळधार पाऊस पडेल हे सांगता येत नाही. पावसामुळे अनेकदा रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळे नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो. अशामध्ये आता मुंबईकरांना टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण मुंबईकरांना पावसाळ्यामध्ये मोबाईलवर हवामानाचे सर्व अपडेट्स मिळणार आहेत. मुंबई महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मंगळवारी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.


मुंबई महानगरपालिकेने मंगळवारी सांगितले की, मुंबईतील नागरिकांना पावसाळ्यात एसएमएसद्वारे त्यांच्या मोबाईल फोनवर हवामानाचे सर्व अपडेट्स मिळतील. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना एसएमएस अलर्ट पाठवला जाईल. मुंबई महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी मंगळवारी मान्सूनची तयारी म्हणून आपत्ती व्यवस्थापनावर विविध विभागांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.


आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून पावसाळ्यामध्ये हवामानाचे वेळोवेळी अलर्ट देणारी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांना पावसाळ्याच्या काळात वेळोवेळी अपडेट्स देणारी एसएमएसची यंत्रणा यंदा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एका एसएमएस ॲपच्या सहाय्याने हे एसएमएस अलर्ट नागरिकांना पाठवण्यात येणार आहे. यामुळे मुंबईकरांना पावसाळ्यामध्ये घरबसल्या किंवा आहे त्या ठिकाणावरुन हवामानाचे अपडेट्स मिळणार आहे. यावरुन ते पावसाळ्यात घराबाहेर पडण्याचे नियोजन करु शकणार आहेत.


दरम्यान, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी विशेष बैठक घेतली. मुंबईत पावसाळ्यात होणारी पूरस्थिती रोखण्यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना यावेळी त्यांनी बैठकीमध्ये दिल्या. तसंच, मुंबई शहर आणि उपनगरात 15 मे नंतर रस्त्यांवर खोदकामासाठी कोणतीही परवानगी देऊ नये, अशा सूचना त्यांनी सर्व यंत्रणांना दिल्या आहेत.