आम्ही श्रद्धेचा बाजार होऊ देणार नाही : खा. विनायक राऊत

Edited by:
Published on: January 21, 2024 14:37 PM
views 110  views

वेंगुर्ला :  राममंदिर होण्यामागे कारसेवकांचे योगदान आणि त्यांचे बलिदान महत्त्वाचे आहे. ६ डिसेंबर १९९२ व २२ जानेवारी २०२४ हे सुवर्णक्षण पुढील हजारो वर्षे नविन पिढी त्याची नोंद घेतील. कारसेवकांचा सन्मान हा निश्चितच कौतुकास्पद आहे. आम्ही श्रद्धेचा बाजार होऊ देणार नाही असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी कारसेवकांच्या सन्मानावेळी केले.

अयोध्येतील मंदिर व श्रीरामांच्या प्रतिष्ठापनेनिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे वेंगुर्ला शिवसेना पक्षातर्फे वेंगुर्ला येथील कारसेवकांचा खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये श्रीनिवास फाटक, निलम गावडे, बाबूराव खवणेकर, विनोद लोणे, हेमलता वैद्य, सुगंधा मांजरेकर, उल्हास महाजन, बाळा कदम, देवीदास वेंगुर्लेकर तसेच दिवंगत असलेले उमेश दिपनाईक, द्वारकानाथ साळगांवकर, केशव तारी यांच्यावतीने त्यांच्या नातेवाईकांचा समावेश होता. वेंगुर्ला येथील भाऊ मंत्री यांच्या राममंदिरात झालेल्या या कार्यक्रमावेळी उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा समन्वयक चंद्रकांत गावडे, सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे संफप्रमुख शैलेश परब, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, लांजाचे माजी सभापती दत्ताजी कदम, लांजाचे उपतालुकाप्रमुख रवी डोळस, बांद्राचे माजी नगरसेवक त्र्यंबके, वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष नाथा मांजरेकर, वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत परब, उपतालुकाप्रमुख संजय गावडे, शहरप्रमुख अजित राऊळ, वेंगुर्ला युवासेनेचे पंकज शिरसाट आदी व्यासपिठावर उपस्थित होते.

याच कार्यक्रमात राममंदिरचे व्यवस्थापक भाऊ मंत्री तसेच वेंगुर्ला शिवसेनेच्या शहर महिला संघटिका मंजूषा आरोलकर यांची कन्या कु. नेहा आरोलकर हिची जागतिक बँक आणि भारतीय कृषी संधान परिषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत स्पेन येथील विद्यापीठासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याबद्दल खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.