रत्नागिरी, सिंधुदुर्ग आपल्याला जिंकायचं

महायुतीच्या उमेदवाराला विजयी करायचय : नारायण राणे
Edited by: विनायक गांवस
Published on: August 03, 2024 14:43 PM
views 213  views

सावंतवाडी : जिल्ह्यात एकसंघपणे काम केलं पाहिजे. गट तट असता नयेत. आगामी निवडणूकीत महायुतीचा जो  उमेदवार असेल त्याला निवडून आणायच असून रत्नागिरी, सिंधुदुर्गत आपल्याला जिंकायचा आहे असं आवाहन माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांना केलं. तर मी मराठवाड्यात जाणार आहे. फडणविसांवर बोलणारा जरांगे, मोदींवर बोलणाऱ्या उद्धव ठाकरे व संजय राऊत यांचा समाचार घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच मोदी, शहांवर जो बोलेल त्याचा निषेध जिल्ह्यात झाला पाहिजे असंही ते म्हणाले. भाजप विस्तारीत कार्यकारिणी बैठकीत मनोगत व्यक्त करताना माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे बोलत होते. 

ते म्हणाले, विजय माझा असला तरी श्रेय हे मतदार, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच आहे. भविष्यातील विधानसभा निवडणुक पाहता आपण आत्मपरीक्षण करणं देखील आवश्यक आहे. कार्यकर्ता हा भाजपच सैन्य आहे. इतर पक्षांपेक्षा आपला कार्यकर्ता तरबेज आहे. आपल्या बुथवर, तालुक्यात जे मिळवल ते विधानसभेसाठी पुरेसं आहे का ? याचा विचार आपण करायला हवा. नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. १८ तास ते काम करतात. त्यांच्याकडे प्रदिर्घ असं ज्ञान आहे. २०१४ ला जागतिक अर्थव्यवस्थेत देश ११ व्या स्थानी होता. आज देश पाचव्या क्रमांकावर आहे. ही सोप्पी गोष्ट नाही. भारताला हिणवायणे, निंदा करायचे यांना मोदींनी दाखवून दिलं. २०३० पूर्वी जागतिक अर्थव्यवस्थेत भारत तिसऱ्या क्रमांकावर असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २०४७ ला १०० वर्ष देशाला होताना एक विकसित देश असणार आहे. २५ कोटी लोकांची गरिबी त्यांनी दूर केली. ८० कोटी लोकांना अन्नपुरवठा केला पुढेही करणार. महिला, तरूण, विद्यार्थांना शेकडो योजना त्यांनी दिल्यात. जगात एकमेव असे पंतप्रधान आहेत असं मत राणेंनी व्यक्त केल.

तसेच कार्यकर्ता या शब्दाचा अर्थ मोठा आहे. जनतेची सेवा करणारा, जनतेच हित साधणारा हा कार्यकर्ता आहे‌. असा कार्यकर्ता हेगडेवारांना अपेक्षित आहे. राज्यातील काही लोक टिका करत आहेत. आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहांबद्दल कोणीही काही बोललं तरी सिंधुदुर्गात निषेध झालाच पाहिजे. तसेच जिल्ह्यात एकसंघपणे काम केलं पाहिजे. उमेदवार कोणीही असूदेत त्याला निवडून आणण आपल काम आहे‌.‌ लवकरच मी मराठवाड्यात जाणार असून फडणविसांवर बोलणारा जरांगे, उद्धव ठाकरे व संजय राऊत यांचा समाचार घेणार असा इशारा त्यांनी यावेळी दिला. तर विधानसभेची ही निवडणूक महत्त्वाची आहे. अडीच वर्षांत कारभार कळला नाही तो माणूस घोषणा करत सुटला आहे. या जिल्ह्यात शिवसेना शिल्लक रहाता नये. त्यामुळे आता कामाला लागा असे  आवाहन राणेनी केलं.

दरम्यान, माझ्या विजयात रविंद्र चव्हाण यांचा सिंहाचा वाटा आहे. दिवसरात्र काम करणारा हा माणूस आहे. उद्याच्या निवडणूकीत महायुतीचा जो  उमेदवार असेल त्याला निवडून आणायच आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गत आपल्याला जिंकायच आहे. निवडणूक आली की बातम्या येतात. मात्र, राज्यातही आपली सत्ता येणार आहे. त्यासाठी जोमाने कामाला सुरूवात करा असे आदेश नारायण राणेंनी दिले.