
मालवण : छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा सातत्याने आपण स्वीकारत राहिले पाहिजे. या शिवाची पूजा करायची असेल तर त्याचे गुण आत्मसात करायला हवेत. हे गुण केवळ आत्मसात करून चालणार नाहीत तर ते प्रकट केले पाहिजेत. त्याचबरोबर हे गुण पुढच्या पिढीमध्ये संक्रमित करायला हवेत. हे आपण जेव्हा करू तेव्हाच छत्रपतींचे जे स्वप्न होते की आपल्या देशाला, हिंदू राष्ट्राला पुढे घेऊन जायचे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवरायांसमोर आज संकल्प करूया की आपल्या देशाला परम वैभवापर्यंत घेऊन जात नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही आणि हे करण्यासाठी हे शिवराया आम्हाला शक्ती दे असे साकडे हिंदू जागरण मंचाचे प्रांत संयोजक अभयराजे जगताप यांनी आपल्या व्याख्यानातून घातले.
जिल्ह्याच्या अभिमानाचे आणि शिवभक्तांच्या श्रद्धेचे ठिकाण म्हणजे किल्ले सिंधुदुर्ग. या किल्ल्यातील जगातील पहिल्या श्री शिवराजेश्वर मंदिरात आज पारंपरिक शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ढोल ताशांचा गजर आणि जय भवानी... जय शिवाजी... असा जयघोष करत शिवप्रेमींनी किल्ला परिसर दणाणून सोडला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना गेल्या तीन वर्षांपासून घोष मानवंदना दिली जात आहे. यावर्षीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने छत्रपतींना घोषमानवंदना देण्यात आली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक डॉ. अरविंद कुडतरकर, जिल्हा कार्यवाह लवू म्हाडेश्वर, हिंदू जागरण मंचाचे प्रांत संयोजक अभयराजे जगताप, प्रा. पवन बांदेकर, ॲड. हेमेंद्र गोवेकर, रत्नाकर कोळंबकर, शिवराजेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी सकपाळ, विजय सकपाळ, श्रीराम सकपाळ, हितेश वायंगणकर मंगेश सावंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहराध्यक्ष बाबा मोंडकर, महेश मांजरेकर, राजन वराडकर सरपंच भगवान लुडबे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, महिला शहराध्यक्ष चारुशीला आचरेकर, महिमा मयेकर, राणी पराडकर, रश्मी लुडबे, चित्रा हरमलकर, श्री. लोकेगावकर, अमिता निवेकर, ललित चव्हाण, श्रीराज बादेकर, भाऊ सामंत, बबन परुळेकर यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, शिवप्रेमी, भंडारी हायस्कूलचे विद्यार्थी एनसीसी चे विद्यार्थी तसेच किल्ला रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. जगताप म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वत्वाची शिकवण दिली आहे महाराजांनी स्वत्वाचे जागरण केले. त्यामुळे जी दिनदर्शिका आहे त्याचा आपण स्वीकारत नसू तर कसले स्वत्व आहे आपल्याकडे. महाराजांनी प्रचलित असलेले साडेबाराशे पारसी शब्द काढून टाकण्याचे काम केले. अफजल अफजल खान मारला, शाहिस्तेखानाची बोटे छाटली त्याचबरोबर स्वत्वाच्या जागरणाचे जे काम त्यांनी केले ते सुद्धा आपण स्वीकारले पाहिजे. तारीख हा शब्द पारसी आहे. दिनांक हा शब्द इंग्रजांचा आहे. मात्र महाराजांनी हे शब्द टाळत पंचांगाचा वापर केला आहे. भारतीय दिनदर्शिका आहे. त्याचा वापर महाराजांनी केला आहे. त्यामुळे महाराजांचे दिवस, प्रसंग हे आपण तिथीप्रमाणे साजरे करायला हवेत. पुण्यतिथी, राज्याभिषेक जयंती हे ही तिथीप्रमाणेच साजरे केले पाहिजेत. बाराव्या ज्योतिर्लिंगा नंतर तेरावे ज्योतिर्लिंग हे रायगड आहे १४ वे ज्योतिर्लिंग हे संभाजी महाराजांची समाधी आहे. ही दोन ज्योतिर्लिंग झाली म्हणूनच ती बारा ज्योतिर्लिंग टिकली आहेत. त्यामुळे या दोन्ही ज्योतिर्लिंगाची वारी करायला हवी महाराजांच्या समाधीचे दर्शन घ्या. हे दर्शन घेतल्यानंतर जगदीशश्वराच्या मंदिरात प्रवेश केल्यानंतर तेथे आपल्याला महाराजांनी करून घेतलेला शिलालेख दिसून येईल. त्या शिलालेखमध्ये कोणत्या दिवशी राज्याभिषेक झाला याचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी राज्याभिषेक झाला आहे. त्यामुळे राज्याभिषेक कोणत्या दिवशी साजरा करायचा हे आपण ठरवायला हवे. महाराजांची जी वृत्ती होती ती स्वाभिमानी, राजाभिमानी होती ती महाराजांनी लोकांच्या मनावर संक्रमित केली होती. ज्यावेळी देश, राष्ट्र आवाज देईल त्यावेळी आपल्या संस्काराची, संस्कृतीची रक्षण करण्याची वेळ येईल. त्यावेळी माझे वैयक्तिक मोह माया बाजूला ठेवून मी माझ्या देशाच्या, राष्ट्राच्या संरक्षणासाठी पुढे सरकेन अशा प्रकारचा भाव छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांच्या मनात निर्माण केला. त्यामुळेच हा इतिहास घडला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एखाद्या विशिष्ट दिवशी झाला म्हणून ते मोठे झाले नाहीत त्यांना जिजाऊ मातेने तसं घडवलं म्हणून ते कर्तृत्व गाजवू शकले. सध्याच्या परिस्थितीत असे म्हटले जाते की आज छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायला हवेत. मात्र शिवाजी महाराज जन्माला येत नसतात. जर आज शिवाजी महाराज जन्माला यायला हवे असतील तर जिजाऊ माता जन्माला यायला हवी. तीच जर जन्माला आली तरच शिवबा घडणार आहे. आज आपल्याला आनंद आहे की आजच्या जन्मोत्सव सोहळ्यास येथे असंख्य जिजाऊ उपस्थित राहिल्या आहेत.
ते म्हणाले, शिवाजी महाराजांकडे एक व्यक्ति म्हणून पाहू नका. शिवाजी महाराज ही एक व्यक्ती नव्हती तर ती वृत्ती होती. त्याकडे एक वृत्ती म्हणून पहा. त्यांची ही वृत्ती काय होती हे आपण सर्वांनी समजून घेतले पाहिजे. त्या काळातील जी काही कागदपत्रे होती त्यातून महाराजांची वृत्ती आपल्याला समजणार आहे. ते कोण होते. कशासाठी त्यांनी काम केले. त्यांच्या मनात जे इप्सित आहे, त्यांच्या मनात जे ध्येय आहे ते त्या कागदावर संक्रमित झालेले आहे. त्यांचा पराक्रम जो कागदावर लिहिला गेला आहे. त्या कागदावरूनच महाराजांची कोणती कार्यप्रणाली होती हे समजून घ्यायला हवे असेही श्री. जगताप यांनी स्पष्ट केले.
या व्याख्यानानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घोषमानवंदना दिली त्यानंतर शिव आरती करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता यानंतर या जन्मोत्सव सोहळ्याची सांगता झाली.