राणे - केसरकरांच नाव न घेता ठाकरेंचा 'बाण'

त्यांच्या ठेकेदारांसह भाजपला देशातून पळवून लावा ! देशात भाजप तडीपारचा नारा : आदित्य ठाकरे
Edited by: विनायक गांवस
Published on: May 04, 2024 16:17 PM
views 158  views

सावंतवाडी : इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या जाहीर सभेत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले, पलिकडे एक सभा सुरू आहे. फुटलेले पक्ष, मिंदे गॅंग आहेत. जय श्री राम चा नारा दिला जात आहे‌. राम आमचाही आहे. आम्ही रामासह हाताला काम देखील मानतो. पण, कोकणचा हायवे हे पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे भाजपच्या ठेकेदारांना पळवून लावायची हीच ती वेळ आहे. त्यासाठी देशातूनही भाजपला पळवून लावलं पाहिजे. आता भाजप तडीपारीचा नारा देशभरात आहे असं विधान आदित्य ठाकरे यांनी सावंतवाडीतील जाहीर सभेत केलं. 

ते म्हणाले, दक्षिण भारतात भाजपला मतदान होणार नाही. तिकडे इंडिया आघाडीला चांगलं वातावरण आहे. चारशे नाही, दोनशे पार भाजप करू शकत नाही. भाजपची तानाशाही लोकांना नको आहे. ३७० कलम काढण हे आमचंही स्वप्न होतं. तो दिवस आम्ही देखील साजरा केला. पण, भाजपने दिलेली आश्वासन पूर्ण केली नाहीत. आज ३७० कलम हटवलं तिकडे यांना उमेदवार मिळत नाही आहेत. सगळीकडे परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. भाजप हरायला आलं की हिंदू-मुस्लिम वाद, जातीयवाद करत आहे‌. आज यातील भाजपच कुठलंच कार्ड चालत नाही आहे‌. महाराष्ट्रात देखील यांना थारा मिळणार नाही आहे. धर्मा-धर्मांत, जाती-जातीत वाद करून संविधान बदलायचा डाव भाजपचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले हे संविधान ते बदलू पहात आहेत. भाजपला सगळ्यांचं आरक्षण काढू घेऊन पहात आहेत. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा द्वेष करत आहेत. त्यांना देशभक्ती नको, भाजप भक्ती हवी आहे. ते आम्ही करणार नाही, होऊ देणार नाही असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.

भाजपला मागून वार करायची सवय आहे. समोरून वार करायची हिंमत नाही‌. सिंधुदुर्गतील दोन चेहऱ्यांना काय कमी दिलं ? असा सवाल करत गांधी चौकात लागलेल्या नारायण राणे व दीपक केसरकर यांच्या बॅनरकडे अंगुलीनिर्देश केल. आपल्या राज्यातून अनेक प्रकल्प गुजरातला गेले तेव्हा हे दोघे एक शब्द तरी बोलले का ? माझं भांडण गुजरातशी नाही तर केंद्र सरकारशी आहे. कदाचित देशात मंत्रालय देखील गुजरातला हलवलं जाऊ शकत. शेतकरी, महिला, युवा व गरिब या चार जाती भाजपला आज आठवत आहेत. दहा वर्षांत काय केल यावर भाजप बोलत नाही. ते मटण, मांस, मच्छीवर बोलत आहेत. जनतेतून ठाकरेंचं सरकार पाहिजे असं सांगितलं जातं आहे. 

शेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या भाजपला तुम्ही मतदान करणार का ? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. रिफायनरी सारखे प्रकल्प महाराष्ट्रात आणि चांगली रांगोळी गुजरातला. एवढा महाराष्ट्र द्वेष भाजपला का ? धोके आणि खोके द्यायचं काम महाराष्ट्रातील सरकार करत आहे.  देशातील महिला आज सुरक्षित नाही आहेत‌. महिला नेत्यांना शिव्या घालणारे मंत्री महाराष्ट्र सरकारमध्ये आहेत. खोके खाऊन सरकार पाडायचं काम भाजपने केल आहे. बलात्काऱ्यांना संरक्षण देणारं भाजप आहे. मतदान करताना शेतकरी, महिला, युवकांनी करायला हवा. महागाई काही कमी होत नाही आहे. गरिबी हटत नाही आहे. सामान्यांच जगण कठिण झालं आहे. उलट गेल्या दहा वर्षांत गरीबी वाढली आहे. जीडीपी तर तिपटीनं वाढला आहे. जगणं परवडत नाही आहे. भाजपने दिलेली वचने फोल ठरली आहेत. जुमल्याचं नाव गॅरंटी केलं आहे असा हल्लाबोल ठाकरेंनी केला. अडीच वर्षांत महाविकास आघाडीनं केलेली कामं अभिमानाने सांगू शकतो. भाजप दहा वर्षांत केलेली कामं सांगतील का ? असा सवाल केला.

असली सेना, नकली सेना आरोप बाहेरचे नेते करत आहेत. डुप्लीकेट नावाचा उमेदवार विनायक राऊत यांच्या विरोधात उभा केला आहे. पण, ४ जूनला जनताच भाजपला त्यांची जागा दाखवून देईल अस विधान त्यांनी केलं. तर 'वन हाफ' परिवाराला ठाकरेंवर बोलण्याचा पगार मिळतो. तर पन्नास खोके व्हॅनिटीला वापरले असा आरोप करत नारायण राणे व दीपक केसरकर यांच नाव घेण आदित्य ठाकरे यांनी टाळलं. तर जमिन लुटणाऱ्यांना, चिंधीचोरांना, कोंबडी पळवणाऱ्यांना संधी देणार की विनायक राऊत निवडणार ? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी जनतेला केला. २४ तास जनतेचा विचार करणारे खासदार राऊत आहेत. त्यामुळे विनायक राऊत यांना दिल्लीला पाठवा, मशालीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अंधकार दुर करा असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केल.

याप्रसंगी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, ज्येष्ठ शिवसैनिक अण्णा केसरकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, अतुल रावराणे, कॉंग्रेस नेते विकास सावंत, माजी नगराध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, महिला नेत्या कमलताई परूळेकर, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, सहसंपर्कप्रमुख शैलेश परब, जान्हवी सावंत, बाबुराव धुरी, रूपेश राऊळ, पुंडलिक दळवी, महेंद्र सांगेलकर, समीर वंजारी, बाळा गावडे, मायकल डिसोझा  आदींसह इंडिया आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.