पाणलोट रथयात्रेस दोडामार्गमधून होणार सुरुवात

Edited by:
Published on: January 24, 2025 18:13 PM
views 125  views

सावंतवाडी : माती व पाणी या दोन महत्त्वाच्या घटकांशी निगडित असलेला मृद व जलसंधारण विभाग शेती व सिंचन या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्याअनुषंगाने केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक २.० योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. राज्यात पाणलोटसंदर्भात जनजागृती करण्यासाठी जानेवारी ते मार्च असे तीन महिने पाणलोट रथयात्रा काढण्यात येणार आहे. त्याची सुरूवात दोडामार्ग तालुक्यातून होणार असल्याची माहिती मृद जलसंधारण उपविभागीय अभियंता रामचंद्र धोत्रे यांनी दिली.

राज्यस्तरीय पाणलोट रथयात्रेचे जिल्हास्तरीय नियोजन करण्यासाठी आढावा बैठक पार पडल्या असून ही रथयात्रा जास्तीजास्त गावात पोचावी यासाठी आम्ही सर्वजण प्रशासन पातळीवर प्रयत्न करत असून यात्रेची सुरूवात राज्यांच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याच्या उपस्थितीत होणार आहे.ही यात्रा दोडामार्ग मधून सुरूवात होणार आहे.त्यानंतर यात्रा दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावांना भेटी देणार आहेत. यामध्ये  केगद दोडामार्ग तालुक्यातील सासोली, कळणे, माटणे, वझरे, शिरवल, कुंभवडे, केगद, कुब्रल, कुडासे, पिकुळे, झरे, मागेली, खोक्रल, वैभववाडी तालुक्यातील अरूळे निमअरूळे कोकिसरे नारकरवाडी कुंभवडे आदी गावाचा समावेश असणार असून या यात्रेनिमित्त गावागावात जनजगृती जलपूजन प्रभात फेरी आदिचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच काही गावात रांगोळी स्पर्धा पथनाट्य विद्यार्थ्याची पाणी या विषयावर वक्तृत्व स्पर्धा ही पार पडत असल्याचे धोत्रे म्हणाले. सध्या गावागावात ग्रामपंचायत स्तरावर मोठ्याप्रमाणात कार्यक्रम होत असून गावकऱ्यामध्ये पाणलोट यात्रेनिमित्त उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पाणलोट रथयात्रेचे आयोजन व्यापक प्रमाणात करण्यात येत असून, या कार्यक्रम अंमलबजावणीसाठी जिल्हापातळीवर तालुका पातळीवर उपविभागीय अधिकारी (महसूल) उपविभागीय जलसंधारण अधिकारी अशा वेगवेगळ्या समित्या नेमण्यात आल्या. सर्वजण यात्रा उत्साहात व्हावी उत्स्फूर्त स्वागत करण्यात व्हावे यासाठी काम करत आहेत.