
सावंतवाडी : शहराच्या पाणीपुरवठ्याचा महत्वाचा भाग असलेल्या चिवार टेकडी येथील पाण्याच्या साठवण टाकीची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवार १७ आणि गुरुवार १८ सप्टेंबर रोजी शहराच्या अनेक भागांतील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
नगरपरिषदेने दिलेल्या माहितीनुसार पाणी टाकीच्या नियमित साफसफाईमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील नागरिकांना यामुळे होणाऱ्या गैरसोयींबद्दल नगर परिषदेने दिलगिरी व्यक्त केली आहे. या कालावधीत सबनीसवाडा, बाहेरचावाडा, काजरेकर घरापासून काजरंकोंडपर्यंत, सिक्वेरावाडा, लाडाची बाग, सुवर्ण कॉलनी, बिरोडकर टेंब, डोंगरे पाणंद, कॉ टेज हॉस्पिटल, आयुर्वेद हॉस्पिटल, खासकीलवाडा, म्हादळभाट, कामत लाईन, रसाळ पाणंद, तिलारी रोड, समाज मंदिर परिसर, जिमखाना मैदान, गोठण, बजरवाडी, नाडकर्णी पाणंद, जेल परिसर, जगन्नाथ भोसले उद्यान मागील भाग, शिल्पग्राम परिसर आणि श्रमविहार कॉलनी या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहील.
त्यानंतरच्या दोन दिवसांत, म्हणजेच १९ आणि २० सप्टेंबर रोजी, पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि आवश्यक पाणी साठवून ठेवावे, असे आवाहन नगर परिषदेने केले आहे.










