देवगडात विहिरींनी गाठला तळ ; नागरिकांची पाण्यासाठी वणवण

गडूळ पाण्यासह न परवडणाऱ्या विकतच्या पाण्यासाठीही करावा लागतोय संघर्ष
Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 15, 2024 14:17 PM
views 263  views

देवगड : देवगडात विहिरींनी तळ गाठला असून नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई आणि गढूळ पाणी प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे.  इतकचं नव्हे तर तालुक्यात शहर आणि अनेक गावात पाणी विकत घेण्याची दुर्दैवी वेळ देवगडवासियांवर येऊन ठेपली आहे.


    देवगड तालुक्यात शहर आणि अनेक गावात पिण्यायोग्य पाणी नसल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होत आहे. अक्षरशः विकतच पाणी प्यावं लागतंय. निम्मा मे महिना बाकी असल्याने करायचं काय ? जगायचं कसं ? असा प्रश्न  ग्रामस्थांसमोर उभा ठाकलाय. या साऱ्या प्रकाराने लोकप्रतिनिधींनी वेळोवळी केलेले टँकर मुक्तचे दावे फोल ठरतानाचे चित्र आहे. तर 2 ते 3 कोटींच्या नळपाणी योजनेचाही फारसा मोठा फायदा नागरिकांना झालेला दिसत नाहीये. यावर प्रशासनानं गांभीर्याने विचार करून ठोस उपाययोजना करायला हवी, अशी मागणी पुढे येत आहे.  निवडणुकीच्या काळात जनसामान्यांचे आपणच कैवारी आहोत, आपणच या भागाचे विकास पुरुष आहोत असे सांगत सर्वपक्षीयांनी जो नागरिकांकडे मतांसाठी जोगवा मागितला तर त्या पुढाऱ्यांनी याकडे प्रकर्षाने लक्ष देणे आवश्यक आहे. कारण आता प्रचार संपलाय, निवडणूकही झाली. त्यामुळे सर्वसामान्यांचा जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि पुढारी पुढाकार घेतील का हे पाहणे देवगड वासियांसाठी महत्वाचे ठरणार आहे. 

    मुळात देवगड - जामसंडे शहरात तसेच तालुक्यातील इतर गावांवर पाणीटंचाईचे संकट घोंगवते आहे. देवगड जामसंडेचा पाणीपुरवठा  तर बंद झाला आहे. अनेक गावात विहिरी कोरड्या पडल्या आहेत. आणि जिथं पाणी मिळतंय ते केवळ गढूळ आहे. यामुळे आरोग्याला धोका तर आहेच. एवढेच नाही तर आता दुष्काळात तेरावा महिना म्हणतो तस् पाणी विकत घेण्याची वेळ देवगडकरांवर आलीय. 

शहर आणि तालुक्यातील अनेक गावे तहानलेलीच..

देवगड जामसंडे शहरातच नव्हे तर  तालुक्यातील अनेक गावांवर पाणीटंचाईचे संकट आहे. अनेक गावात नळपाणी योजनांचा पाणीपुरवठा बंद झाला. विहिरांनी तळ गाठलाय. त्यामुळे  महिलांना बऱ्याचदा पहाटे लवकर उठून तळाला गेलेल्या विहिरीत पाणी शोधावं लागतय. भले ते गडूळ असेल तरीही. आनंदवाडीची जशी अवस्था आहे तशीच देवगड शहरात व इतर गावांमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. दहीबाव अन्नपूर्णा नदीपात्रातून जलवाहिनीच्या माध्यमातून केला जाणारा पाणीपुरवठा हा नेहमीच ही पाईपलाईन ठिकठिकाणी फुटल्यामुळे अडचणीचा मुद्दा ठरतो आहे. या नदी पात्रातील पाणी हे देवगड - जामसंडे शहराला तसेच इतर गावांना देखील हा पाणीपुरवठा केला जातो. येथील ग्रामपंचायत पंपिंग करून एकीकडे पाणी खेचत असते तर देवगड व जामसंडे व येथील गावे असा पाणीपुरवठा या नदीतून होत असल्याने येथील पाणीसाठा हा नेहमीच कमी होतो. 

शिरगाव पाडाघर येथील नदीपात्र बारमाही पाणी वाहत असते. परंतु हे पाणी योग्यप्रकारे साठवणूक करणे आवश्यक आहे. मात्र अशी  उपायोजना अद्यापही केली नसल्यामुळे देवगड जामसंडे व इतर गावांना मुबलक पाणी मिळत नसल्याने नागरिक एन उन्हाळ्यात पाण्यासाठी मात्र तहानलेलेच आहेच. 

टँकर मुक्तीचा दावा ठरतोय फोल?

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तर काही लोकप्रतिनिधींनी देवगड टँकर मुक्त आहे. एप्रिलच काय मे महिना जरी आला तरी टँकर आणावा लागत नाही, असं छातीठोकपणे सांगितलं होत. मात्र आताचे जर वास्तव  पाहिले तर विहिरींना गाठलेला तळ, मिळणारे पाणी गढूळ आणि त्यात महिलांना घ्यावं लागणार विकतच  पाणी यामुळे महिलांत तर गावो गावी तीव्र भावना आहेत. आनंदवाडी येथील महिलांनी तर जास्त किंमतीने पाणी विकत घ्यावं लागत याबाबत नाराजी व्यक्त केलीय. हा भाग ग्रामीण भागातही मोडत नाही की कातळावरही वसलेला नाही. देवगड शहराचाच भाग मात्र आता मे महिनाचा दुसरा आठवडा पाण्यासाठी  नागरिकांना पाणी पाणी करायला लावतो आहे.