
बांदा : दांडेली गावातील ग्रामस्थांना पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी ग्रामपंचायतच्या पुढाकारातून जलजीवन मिशन अंतर्गत नळपाण्याच्या टाकीचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच नळयोजनेची जीर्ण पाईपलाईन अद्ययावत करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांना वेळेत व मुबलक पाणीपुरवठा करणे शक्य होणार असल्याचे दांडेली सरपंच दादा पालयेकर यांनी सांगितले.
दांडेली येथे जलजीवन मिशन अंतर्गत आराखड्यातील कामांचे भूमिपूजन आरोस येथील जमीन मालक बुधाजी परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच दादा पालयेकर बोलत होते. उपसरपंच दिनेश माणगावकर, सदस्य निलेश आरोलकर, प्रफुल्लता मालवणकर, माजी सरपंच बाळा मोरजकर, संजू पांगम, माजी उपसरपंच योगेश नाईक, ग्रामस्थ राजन पुनाळेकर, शैलेश परब, पिंटू नाईक, रस्त्यासाठी जमीन देणारे श्री.ठाकूर (दांडेली) व श्री.नाईक (आरोस) आदी उपस्थित होते.
बुधाजी परब यांनी विनामोबदला जमीन पाण्याच्या टाकीसाठी दिली तर आरोस येथील श्री. नाईक व दांडेली येथील श्री. ठाकूर यांनी रस्त्यासाठी जागा दिल्याचे सरपंच दादा पालयेकर यांनी सांगितले.