
सावर्डे : पाणी हे सर्वांसाठी अत्यंत गरजेचे आहे. त्याच्याशिवाय सजीव प्राणी, झाडे यांचा विनाश होईल. त्यामुळेच 'जल है तो जीवन हे' असे मानले जाते. आपल्या जीवनात म्हणूनच पाण्याचे महत्व मोठे आहे. निरोगी व सुदृढ जीवनासाठी स्वच्छ पाणी अत्यंत आवश्यक असून नियमितपणे पाण्याचा पिण्यासाठी वापर उकळून थंड करूनच करावा व दररोज निसर्गात तीस मिनिटे तरी व्यायाम करावा हाच सुखी जीवनाचा राजमार्ग आहे असे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैष्णवी वानखडे यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना मूलमंत्र दिला.
सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाणी सुरक्षा या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र सावर्डे चे वैद्यकीय अधिकारी वैष्णवी वानखडे, आरोग्य सहाय्यक प्रफुल्ल केळसकर,आरोग्य सेविका दिपाली जाधव, विजय देशमुखे व अशा सेविका निशा दिंडे,विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे,उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर,सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
वाढत्या औद्योगिकीकरणामुळे, सर्व नैसर्गिक स्त्रोतांचा अतिवापर आणि शोषणामुळे मानवाला पाण्याच्या तीव्र टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.हे संकट भविष्यात आणखी वाढू शकते कदाचित पुढचे महायुद्ध पाण्यासाठी होऊ शकते. प्रदूषित पाण्यामुळे रोगराईला आमंत्रण मिळते.पाणी हा सर्व सजीवांच्या अस्तित्वाचा एक महत्त्वाचा घटक असल्याने, पाण्याचे महत्त्व आणि त्यानुसार त्याची उपयुक्ततता याविषयी आपण सर्वांनी जागरूक असणे आवश्यक असून पाण्याच्या पुनर्वापरापासून परसबाग जलसंधारण सारखे विविध उपक्रम घरोघरी राबवता येतील त्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करावे व आपल्या कुटुंबापर्यंत याची माहिती द्यावी असे आरोग्य सेवक प्रफुल्ल केळकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात विद्यार्थ्यांना आवाहन केले. अत्यंत साध्या व सुलभ भाषेत त्यांनी विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्व दैनंदिन जीवनातील विविध उदाहरणांद्वारे पटवून दिले विद्यार्थ्यांनीही आपले विविध प्रश्न विचारून या चर्चासत्रात सक्रिय सहभाग नोंदवला. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांनी विद्यालयाकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पाण्याची तपासणी, पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छतेविषयीची माहिती आपल्या प्रास्ताविकातून दिली.