शिवडाव धरणाचे पाणी गडनदीत दाखल..!

कणकवलीसह लगतच्या गावांना दिलासा : शहरावरील पाणी टंचाई संकट टळले
Edited by: उमेश बुचडे
Published on: May 14, 2024 08:26 AM
views 649  views

कणकवली : शिवडाव धरणाचे पाणी गडनदीपात्रात दाखल झाल्याने कणकवली शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्‍यान कणकवली शहरासह हळवल, हरकूळ, सांगवे आदी गावांच्याही नळयोजना पुन्हा कार्यान्वित झाल्‍या आहेत.

गतवर्षी कणकवली तालुक्‍यात सरासरी पेक्षा २० टक्‍के कमी पाऊस झाला होता. तर गडनदीपात्रातील बंधाऱ्यांना गळती लागली. त्‍यामुळे एप्रिल पासूनच कणकवली शहर आणि तालुक्‍यातील अन्य गावांत पाणी टंचाईच्या झळा तीव्र झाल्‍या होत्या. कणकवली शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या कांेंडीतही पाणी साठा कमी झाला होता. यावर पर्याय म्‍हणून नगरपंचायतीने या परिसरातील गाळ उपसा केला. तसेच बंधाऱ्याच्या वरील भागात शिल्‍लक असलेले पाणी आणून शहरवासीयांना पाणी पुरवठा सुरळीत ठेवला होता.

मात्र, हा पाणीसाठा देखील आटत चालल्याने पाटबंधारे विभागाला शिवडाव धरणातील पाणी सोडण्याबाबतचे पत्र दिले होते. त्‍यानुसार १ मे रोजी शिवडाव धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. हे पाणी गडनदीपात्रातील शहर हद्दीमध्ये दाखल झाले. त्‍यामुळे आता पाऊस पडेपर्यंत कणकवली शहरवासीयांची पाणी टंचाईतून सुटका झाली आहे. शिवडाव धरणाचे पाणी गडनदीपात्रात आल्‍याने कणकवली शहराबरोबरच सांगवे, हरकुळ, हळवल आदी नदीकाठच्या गावांच्याही नळयोजना पुन्हा कार्यान्वित झाल्‍या आहेत.