शुकनदीवरील बंधाऱ्याच्या निकृष्ट झडपांमुळे पाण्याची गळती

दुरुस्तीची मागणी
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: January 19, 2026 19:38 PM
views 27  views

वैभववाडी : येथील शुकनदीवर सुमारे ५० लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या झडपा निकृष्ट असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज (ता. १९) माजी नगरसेवक संतोष माईणकर यांच्यासह ग्रामस्थांनी प्रत्यक्ष बंधाऱ्याची पाहणी करून झडपांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली.

वाभवे–वैभववाडी नगरपंचायतीने गेल्या वर्षी शुकनदीवर हा बंधारा उभारला असून काही दिवसांपूर्वी त्यावर झडपा बसविण्यात आल्या. झडपा बसविल्यानंतर बंधाऱ्यात पाणी साठण्यास सुरुवात झाली असली तरी दोन ते तीन झडपा निकृष्ट असल्याने त्यामधून सातत्याने पाण्याची गळती होत आहे. सध्या नदीत पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने बंधाऱ्यात पाणीसाठा दिसत आहे. मात्र प्रवाह कमी झाल्यानंतर बंधाऱ्यात पुरेसा पाणीसाठा होणार नाही. हे महिन्यात पाण्याची टंचाई उद्भवू शकते अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी माजी नगरसेवक संतोष माईणकर यांनी ग्रामस्थांसह बंधाऱ्याची पाहणी केली. यावेळी संकेत माईणकर, राकेश कुडतरकर, रोहीत माईणकर, आकाश कानडे आदी उपस्थित होते.

माजी नगरसेवक माईणकर यांनी सांगितले की, बंधाऱ्यातील तीन झडपांतून पाणी वाहत असून याबाबत नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना तसेच मुख्याधिकाऱ्यांना वारंवार कळवूनही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे झडपा तातडीने दुरुस्त कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, याबाबत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांना विचारले असता ते म्हणाले, पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे एक-दोन झडपा पोकळ ठेवण्यात आल्या होत्या. आता प्रवाह कमी होत असून येत्या आठवड्यात उर्वरित झडपा बसविण्यात येणार आहेत.